बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात ९ हायटेक अभ्यासिका
◻️ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते राजापूर येथे अभ्यासिकेचे भूमिपूजन
संगमनेर LIVE | यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सहकार, शिक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत संगमनेर तालुक्याला राज्यासाठी एक ‘आदर्श मॉडेल’ म्हणून नावारूपास आणले आहे. याच शैक्षणिक क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणून तालुक्यातील तरुणांसाठी ९ अद्यावत अभ्यासिका उभारण्यात येणार असून, ही राज्यातील एक पथदर्शी संकल्पना ठरेल, असा विश्वास युवक कॉग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी व्यक्त केला.
राजापूर येथे ‘ग्रामविकास २५१५' अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ३० लाख रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या अद्यावत अभ्यासिकेच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, “संगमनेर हे अद्यावत शिक्षणाचे केंद्र बनले आहे. राजापूरसह परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. आता स्थानिक स्तरावरच सर्व सोयींनी युक्त अशा अभ्यासिका उपलब्ध झाल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना मोठे बळ मिळणार आहे.”
या कार्यक्रमाला रामहरी कातोरे, संतोष हासे, माधव हासे, सौ. लतिका गायकर, कुसुमताई पानसरे, बाबासाहेब गायकर, सोमनाथ हासे, संजय हासे, प्रदीप हासे, अजय हासे, रावसाहेब खतोडे, राजेंद्र खैरनार, विनीत खतोडे, रमेश जाधव यांच्यासह राजापूर परिसरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप हासे यांनी केले, तर रावसाहेब खतोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. रामहरी कातोरे, संतोष हासे व बाबासाहेब गायकर यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
दरम्यान लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारणारे हे ‘शैक्षणिक मॉडेल' आता संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.