“तुमच्या जागेचे उतारे नावावर करून देण्यासाठी मुन्ना पुंडच्या पाठीशी उभे राहा!”
◻️ आमदार अमोल खताळ यांनी श्रमिकनगरच्या रहिवाशांना दिला शब्द
◻️ संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका
संगमनेर LIVE | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून श्रमिक नगरमधील रहिवाशांच्या जागेचा उतारा त्यांच्या नावावर करून देण्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. “मी शब्दाला जागणारा कार्यकर्ता आहे, दिलेला शब्द शंभर टक्के पाळणार,” असा ठाम विश्वास त्यांनी श्रमिकनगर येथील जाहीर सभेत व्यक्त केला.
श्रमिकनगर प्रभाग क्रमांक १ चे उमेदवार अभिजीत उर्फ मुन्ना पुंड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार खताळ बोलत होते. यावेळी त्यांनी भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, “१९७७ साली माजी मंत्री स्व. बी. जे. खताळ पाटील यांनी या जमिनी नागरिकांना दिल्या होत्या. मात्र, गेल्या ४० वर्षात अनेकांना संधी मिळूनही हा प्रश्न सुटला नाही. आता महायुती सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावला जाईल.”
आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात कामाचा लेखाजोखा मांडला. “मतदान कोणी केले याची पर्वा न करता, प्रत्येक प्रभागात समान काम करणे हे माझे कर्तव्य आहे. गेल्या एका वर्षात या प्रभागासाठी २ कोटी १३ लाख रुपयांचा निधी देऊन विकासकामे सुरू केली आहेत,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.
विरोधकांवर तोफ डागताना आमदार म्हणाले, “काही लोक केवळ इमारती बांधून देण्याची खोटी स्वप्ने दाखवत आहेत. ज्यांच्याकडे अधिकार नाहीत, ते उतारे कसे देणार? असा प्रश्न जनतेने त्यांना विचारला पाहिजे. आम्ही आधी जमिनीचे उतारे तुमच्या नावावर करू आणि त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काची घरे बांधून देऊ.”
“नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे शिवसेनेचेच (महायुतीचे) निवडून येतील. मुन्ना हा होतकरू तरुण आहे, त्याच्या पाठीशी उभे राहा. जर आता चूक झाली, तर त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील, त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी पडू नका.” असे आमदार अमोल खताळ म्हणाले.
या जाहीर सभेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ, उमेदवार मनीषा नेवासकर, सौ. नीलम खताळ, भाऊ जाखडी, आसिफ शेख यांच्यासह श्रमिकनगर परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुवर्णा खताळ आणि मुन्ना पुंड यांनीही रहिवाशांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.