संगमनेर येथील ‘बीझ इंटरनॅशनल' कंपनीचे कोट्यवधींचे साहित्य भस्मसात!
◻️ नऊ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात; आमदार अमोल खताळ यांचा घटनास्थळी दौरा
संगमनेर LIVE | संगमनेर औद्योगिक वसाहतीतील बीझ इंटरनॅशनल (डोअर्स बोर्ड व प्लायवूड) या कंपनीला मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कंपनीचे पत्र्याचे शेड, लाकडी रॉ मटेरियल, महागडी मशिनरी व रासायनिक साठ्यासह सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चांडक बंधूंच्या मालकीची असलेली बीझ इंटरनॅशनल कंपनी नेहमीप्रमाणे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी बंद करण्यात आली होती. त्यानंतर १५ डिसेंबरच्या मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कंपनीला आग लागल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी मालक कपिल जयप्रकाश चांडक यांना दिली.
माहिती मिळताच कपिल चांडक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता, कंपनीतील जुने पत्र्याचे शेड, दरवाजे, लाकूड, फ्लाय कोअर, विनियर, इलेक्ट्रिकल व केमिकल स्टोरेज, प्लांट मशिनरी, तसेच कंपनीचे वॉल कंपाऊंडचेही मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून आले. आगीमुळे कंपनीचा संपूर्ण परिसर धुराने भरला होता.
आगीची भीषणता लक्षात घेता संगमनेरसह अकोले, सिन्नर आणि प्रवरानगर येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. तब्बल नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि अनेक फेऱ्यांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यत कंपनीतील बहुतांश साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले होते.
या घटनेबाबत कपिल चांडक यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात खबरी दिली असून, पोलिसांनी अकस्मात जळीत म्हणून नोंद केली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक व्यापारी महेश जगताप यांनी आमदार अमोल खताळ यांना या नुकसानीबद्दल अवगत केले. त्यानुसार आमदार अमोल खताळ यांनी मंगळवारी सकाळी बीझ इंटरनॅशनल कंपनीच्या जळीतग्रस्त भागाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी चांडक कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करत, शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याचा विश्वास दिला. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी औद्योगिक परिसरातील विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याबाबतच्या सूचनाही आमदार खताळ यांनी संबंधित विभागाला दिल्या.
दरम्यान या पाहणी दौऱ्यावेळी पियुष भंडारी, राहुल गडगे, विलास वर्पे, शेखर साबळे, नितीन हासे, कोमल ऊगले, निलेश चव्हाण, महेश जगताप, तसेच कंपनीचे मालक कपिल चांडक आदी उपस्थित होते.