मिर्झापूरला एकाच पिंजऱ्यात नर आणि मादी बिबट्या जेरबंद!

संगमनेर Live
0
मिर्झापूरला एकाच पिंजऱ्यात नर आणि मादी बिबट्या जेरबंद!

◻️ परिसरात आणखी ८ ते १० बिबटे सक्रिय?; नागरिकांमध्ये घबराट 

संगमनेर LIVE | ​संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द, गोडसेवाडी आणि मिर्झापूर या तीन शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मादी आणि तिचा बछडा (नर जातीचा) अशा दोन बिबट्यांना वनविभागाने एकाच पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. वनविभागाच्या या यशामुळे परिसरातील नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

​गेल्या काही आठवड्यांपासून या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते, तसेच हल्ल्यांच्या घटनांचीही नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी वनविभागाकडे केली होती.

​आमदार खताळ यांच्या मागणीची तात्काळ दखल

​स्थानिक नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी केली होती. आमदार खताळ यांनी या मागणीची दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने जास्त बिबट्यांचा वावर असणाऱ्या ठिकाणी पिंजरे लावण्याचे निर्देश दिले होते.

​वनविभागाने केलेल्या कारवाईनुसार, मिर्झापूर परिसरातील पंढरीनाथ संपत वलवे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास ही मादी बिबट्या आणि तिचा बछडा एकाच वेळी अलगद जाळ्यात अडकले.

​भीती कायम, अजून ८ ते १० बिबटे फरार!

​जेरबंद करण्यात आलेल्या या दोन्ही बिबट्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे नर्सरीत हलविले आहे. मात्र, पकडण्यात आलेले हे फक्त दोनच बिबटे आहेत. परिसरातील नागरिकांच्या मते, या भागात अजूनही आठ ते दहा बिबटे सक्रिय असण्याची शक्यता आहे.

​“केवळ दोन बिबटे पकडल्याने धोका टळलेला नाही. उर्वरित बिबट्यांचा वावर अजूनही शेती आणि वस्तीजवळ आहे. यामुळे शेतीत काम करणे आणि रात्री-अपरात्री बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आहे.

दरम्यान ​यामुळे वनविभागाने उर्वरित बिबट्यांचाही तातडीने व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !