​४० वर्षे दुर्लक्ष करणाऱ्यांकडून रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न

संगमनेर Live
0
​४० वर्षे दुर्लक्ष करणाऱ्यांकडून रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न

◻️ भाजपचे तालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी विरोधकांना फटकारले 

◻️ संगमनेरच्या ८ रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर; श्रेयवादावरून राजकीय खडाजंगी

​संगमनेर LIVE | ​मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-दोन अंतर्गत संगमनेर तालुक्यातील एकूण १५ किलोमीटर लांबीच्या आठ रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. यापैकी चार रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळवण्यात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने आमदार अमोल खताळ यांना यश आले आहे. 

उर्वरित चार रस्त्यांनाही लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळेल. महायुती सरकारमुळेच तालुक्यात विकासाची पायाभरणी होत असून, निधी आणण्यात कोणतेही योगदान नसलेल्या इतरांनी खोटा डंका वाजवून पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असे सडेतोड मत भाजपचे तालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी व्यक्त केले.

​साकूर पठार भागाला ‘महायुती’मुळे गती

​या निधीमुळे साकूर पठार भागाच्या रस्ते विकासाला मोठी गती मिळाली आहे. या भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्यांना जनतेने पराभूत केल्यानंतर आता अचानक विकासाची आठवण झाली आहे. ते केवळ आमदार अमोल खताळ यांच्या कामांचे श्रेय घेण्यात धन्यता मानत असल्याची टीका गुलाबराजे भोसले यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्यावर केली.

​या ८ रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना ऑगस्ट २०२५ मध्ये पत्र देऊन निधी देण्याची विनंती केली होती. यामध्ये ​डिग्रस ते रणखांबवाडी, ​चिखली ते जवळे कडलग, ​खरशिदें ते खांबे,​मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द,​साकूर ते बिरेवाडी, ​तारकसवाडी ते खंडेरायवाडी, ​पारेगाव ते तिगाव, ​वडझरी - शिंदोडी ते ठाकरवाडी या रस्त्याच्या कामाना निधी उपलब्ध झाल्याचे भोसले म्हणाले आहेत.

​'४० वर्षे सत्तेच्या नावाखाली फसवणूक'

​भोसले यांनी स्पष्ट केले की, सध्या तालुक्याच्या विकास प्रक्रियेला महायुती सरकारच्या माध्यमातून मोठे पाठबळ मिळत आहे. आमदार खताळ यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच यापूर्वी कधीही न झालेल्या रस्त्यांच्या कामांना निधी मिळत आहे.

​गुलाबराजे भोसले म्हणाले “मागील चाळीस वर्ष ज्यांना साकूर पठार भागाच्या विकासासाठी काहीही करता आले नाही, तेच आज आमदार खताळ यांच्या कामाचे श्रेय घेण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तालुक्यातील जनता दूधखुळी नाही, काम कोण करत आहे, हे त्यांना चांगले माहीत आहे. बाकीच्यांनी फक्त चाळीस वर्षे सत्तेच्या नावाखाली धमाल करून जनतेची फसवणूक केली. सत्ता गेल्यानंतरही तेच सुरू आहे," अशी बोचरी टीका आमदार सत्यजीत तांबे यांच्यावर केली.

दरम्यान ​आमदार खताळ यांनी साकूर येथील एका कार्यक्रमात (१४ नोव्हेंबर २०२५) या सर्व रस्त्यांच्या कामांना निधी आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे जाहीर केल्यानंतर काहीजण अस्वस्थ झाले असून, यामुळेच त्यांना साकूर पठार भागातील जनतेची आठवण होऊ लागल्याचे भोसले यांनी शेवटी नमूद करत विरोधकांचा समाचार घेतला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !