बिबट्याच्या हल्ल्यातील बालकाच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत
◻️ जवळे कडलग येथे आमदार अमोल खताळ यांची भेट; कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीचे आश्वासन
संगमनेर LIVE | नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर संगमनेरमध्ये परतताच आमदार अमोल खताळ यांनी तातडीने जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चार वर्षाच्या सिद्धेश सुरज कडलग या दुर्दैवी बालकाच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. बिबट्याच्या हल्ल्यातील पीडित कुटुंबाला २५ लाख रुपये आर्थिक मदतीचे पत्र आमदार खताळ यांच्या हस्ते सिद्धेशचे वडील सुरज कडलग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
वनविभागाला तातडीने उपाययोजनांचे निर्देश
जवळे कडलग आणि लगतच्या परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमदार खताळ यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांना स्पष्ट निर्देश देतानापरिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि या परिसरामध्ये जास्तीत जास्त पिंजरे लावावेत, अशा सूचना दिल्या.
बिबट्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवावे
अहिल्यानगर येथील उप वनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्याकडून प्राप्त झालेले २५ लाख रुपये आर्थिक मदतीचे पत्र यावेळी आमदार खताळ यांच्या हस्ते सुरज कडलग यांना देण्यात आले. त्यानुसार तातडीची मदत म्हणून १० लाख रुपये रक्कम आरटीजीएस (RTGS) द्वारे सुरज कडलग यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार. उर्वरित १० लाख रुपये रक्कम पाच वर्षाकरिता व ५ लाख रुपये रक्कम दहा वर्षाकरिता कडलग यांच्या राष्ट्रीयकृत बँकखात्यावर फिक्स डिपॉझिट करण्यात येणार.
शासकीय नोकरीसाठी पाठपुरावा
यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ यांनी कडलग कुटुंबाला आश्वासन दिले. ते म्हणाले, “सिद्धेशच्या मृत्यूने कडलग परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याबाबत माझे वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी बोलणे झाले आहे आणि त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. तुमच्या कुटुंबातील कोणाचे नाव द्यायचे ते मला कळवा, त्यासाठी मी पाठपुरावा करेन.” अशी ग्वाही दिली.
दरम्यान यावेळी संगमनेर उपविभागाचे साहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्यासह संतोष कडलग, सुनील देशमुख, सचिन कडलग, अमोल देशमुख, किरण वामन, राहुल वामन, पवन हांडे, श्रीकांत कडलग, बापू देशमुख, सतीश देशमुख, रोहिदास साबळे, संभाजी कडलग, कैलास आदभाई, महेश सुर्वे, दत्ता कडलग, योगेश पवार, एकनाथ कडलग आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.