तालुका उध्वस्त करणाऱ्यांना वेळीच रोखण्यासाठी पेटून उठा - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
तालुका उध्वस्त करणाऱ्यांना वेळीच रोखण्यासाठी पेटून उठा - बाळासाहेब थोरात

◻️ रेल्वे पळवली, आता पाणी पळवतील - सत्यजीत तांबे

◻️ ​संगमनेर सेवा समितीच्या वतीने आयोजित सांगता सभेत केले आवाहन 


​संगमनेर LIVE | “संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही ४० वर्षे रक्ताचे पाणी केले. निळवंडे धरण असो किंवा थेट पाईपलाईन, प्रत्येक कामात जनतेचा अभिमान जपला. मी मंत्री असताना रेल्वे मार्ग निश्चित झाला होता, मग आताच अडचण काय आली? संगमनेरची रेल्वे कोणी पळवली हे ओळखा आणि तालुका उध्वस्त करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच रोखा," असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

​संगमनेर सेवा समितीच्या वतीने गणेश नगर येथे आयोजित सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, दुर्गाताई तांबे, उत्कर्षाताई रूपवते, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, अर्चना दिघे, डॉ. मैथिलीताई तांबे, बाळकृष्ण महाराज कर्पे, रामहरी कातोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात विकासाचा वारसा आणि सध्याच्या आव्हानांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, गेल्या ४० वर्षात बस स्थानक, निळवंडे धरण आणि थेट पाईपलाईन यांसारख्या योजना राबवून संगमनेरचा लौकिक वाढवला आहे. मात्र, सध्या तालुक्यात गांजा आणि ड्रग्जसारख्या अमली पदार्थाची तस्करी वाढली असून, यामुळे युवा पिढी आणि तालुका उध्वस्त होऊ पाहणाऱ्यांना रोखणे आवश्यक आहे. विशेषतः रेल्वे मार्गासाठी ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले गेले असतानाही हा मार्ग बदलला जाणे हे दुर्दैवी असून, विकासासाठी हा लढा जनतेच्या साथीने असाच सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

​‘बाहेरच्या रिमोटवर चालणारा लोकप्रतिनिधी नको’

​आमदार सत्यजीत तांबे यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “आज रेल्वे पळवली आहे, उद्या पाणी पळवतील. १ डिसेंबरला येथील नवीन लोकप्रतिनिधी रेल्वेची थट्टा करतात आणि ३ डिसेंबरला केंद्रीय मंत्री मार्ग बदलल्याचे जाहीर करतात. संगमनेरला बाहेरच्या रिमोटवर चालणारा नेता नको, तर हक्काची माणसं पाहिजेत. संगमनेर सेवा समितीची सत्ता आल्यास श्रमिक नगर, गांधीनगर भागातील गरिबांना हक्काची घरे देऊ.” अशी ग्वाही दिली.

​केंद्रीय मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

​रेल्वे प्रश्नी बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. २० मिनिटांच्या या बैठकीत मंत्र्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रश्नावर २२ तारखेला महत्त्वाची बैठक होणार असून, रेल्वे पुन्हा मिळवण्यासाठी होणाऱ्या जनआंदोलनात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !