अकोलेची कन्या फिजा सय्यदची ‘सुवर्ण' भरारी!
◻️ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत बजावली ऐतिहासिक कामगिरी
संगमनेर LIVE (अकोले) | नगर जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ आणि आदिवासी तालुका असलेल्या अकोलेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ४७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत अकोलेची सुकन्या आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू फिजा सय्यद हिने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घातली आहे.
पश्चिम बंगालमधील दत्तापुलिया येथे १४ ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि ‘पश्चिम बंगाल सॉफ्टबॉल असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत देशभरातील नामवंत पुरुष आणि महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. फिजा सय्यद हिने या चुरशीच्या स्पर्धेत आपली ताकद, तंत्र आणि सांघिक भावना सिद्ध करत सुवर्ण यशाला गवसणी घातली.
फिजाचा थक्क करणारा क्रीडा प्रवास
सन २०१३ पासून सॉफ्टबॉल खेळात पदार्पण करणाऱ्या फिजाने तालुका स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अत्यंत मेहनतीने प्रवास केला आहे. तिचा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे यामध्ये सन २०१७ मध्ये २४ वी सीनियर महाराष्ट्र सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप (मुंबई) - उपविजेतेपद, सन २०१८ मधील २४ वी ज्युनिअर नॅशनल महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप (छत्रपती संभाजीनगर) - कांस्य पदक, सन २०१८-१९ मध्ये ३६ वी ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप (आंध्र प्रदेश) - महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा, २०१८ मध्ये ‘अंडर-१९’ भारतीय संघातून फिलीपिन्स (क्लार्क) येथे झालेल्या ७ व्या एशियन ज्युनिअर वूमन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व आणि २०२२ मध्ये थायलंड (पटाया) येथे आयोजित एशियन वूमन युनिव्हर्सिटी सॉफ्टबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून चमकदार कामगिरी केली आहे.
फिजाच्या खेळातील सातत्य आणि जिद्दीची दखल घेऊन तिला आजवर अनेक सामाजिक, राजकीय आणि क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नुकताच तिला जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे.
दरम्यान अकोले सारख्या ग्रामीण भागातून येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावणाऱ्या फिजा सय्यदचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, भविष्यातील ऑलिम्पिक स्वप्नांकडे तिची यशस्वी वाटचाल सुरू असल्यामुळे क्रीडाप्रेमींनी तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.