वडगाव पान गावात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; अनेक जणांना घेतला चावा
◻️ पंचक्रोशीतील नागरिकासह पालकांमध्ये भीतीचे वातावरण
संगमनेर LIVE (वडगाव पान) | संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत जवळपास २० ते ३० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शिर्डी परिसरातून आणून सोडलेली कुत्री या त्रासाला कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून वडगाव पान व परिसरातील शिवारात सोडण्यात आले आहे. ही कुत्री आता आक्रमक झाली असून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांवर हल्ले करत आहेत. गेल्या काही दिवसांत गावातील तसेच बाहेरगावच्या अनेक नागरिकांना आणि शाळकरी मुलांना या कुत्र्यांनी लक्ष्य केले आहे.
एकीकडे परिसरात बिबट्याची दहशत असताना आता दुसरीकडे या भटक्या कुत्र्यांमुळे पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत ग्रामपंचायतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत माहिती देताना ग्रामपंचायत अधिकारी संजय कहांडळ म्हणाले की, “मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी डॉग कॅचर पथकास पाचारण करण्यात आलेले आहे. या कुत्र्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.” असे सांगितले.
वडगाव पानचे उपसरपंच सोमनाथ गायकवाड यांनी या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, “लवकरच पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची प्रक्रिया (नसबंदी) हाती घेतली जाईल. मात्र, शिर्डी प्रशासनाने अशा प्रकारे कुत्री इतर गावांच्या शिवारात सोडणे अत्यंत चुकीचे आहे. संबंधित प्रशासनाने याची जबाबदारी स्वीकारून तात्काळ पावले उचलली नाहीत, तर मोठे जनआंदोलन छेडले जाईल. यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन सर्वस्वी जबाबदार राहील.” असा इशारा त्यांनी दिला.