‘श्रेय लाटण्याचे केविलवाणे प्रयत्न थांबवा!’

संगमनेर Live
0
‘श्रेय लाटण्याचे केविलवाणे प्रयत्न थांबवा!’

◻️ आमदार अमोल खताळ यांचा सत्यजीत तांबे यांना इशारा


​संगमनेर LIVE | महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यासाठी आणलेल्या निधीवर विरोधक आपला अधिकार सांगून श्रेय लाटत आहेत. संगमनेरची जनता सुज्ञ असून ती हे सर्व ओळखून आहे, अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार प्रहार केला.

​तालुक्यातील रस्त्यांना आमच्यामुळेच प्रशासकीय मान्यता मिळाली, असा दावा समाजमाध्यमांतून करणाऱ्यांचा समाचार घेताना आमदार खताळ म्हणाले की, “मी आमदार होण्यापूर्वी या रस्त्यांना मंजुरी मिळाली होती, मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचा 'इंटरेस्ट' असल्याने आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामे रखडली होती. तालुक्यात सत्ता परिवर्तन झाल्यावर मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, परिणामी हे रस्ते रद्द झाले होते.”

​सत्ता बदलल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ अंतर्गत हे रस्ते मंजूर व्हावेत म्हणून मी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. केवळ सही-शिकक्यांचे पत्र देऊन निधी मिळत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष भेटीगाठी आणि प्रयत्न लागतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

​खताळ यांनी माध्यमांसमोर मंत्रालयीन कक्ष अधिकाऱ्यांचे पत्रच सादर केले. या पत्रात नाशिक कार्यकारी अभियंत्यांना स्पष्ट आदेश असून, त्यात आमदार अमोल खताळ यांच्या पत्राचा आणि शिफारशीचा स्पष्ट उल्लेख आहे. यामुळे विरोधकांचे दावे फोल असल्याचे त्यांनी सिद्ध केले.

​साकूर पठार भागातील नामंजूर रस्त्यांवरून विरोधकांनी निषेधाचे फलक लावून राजकारण केले. मात्र, टीका-टिपणीकडे दुर्लक्ष करून आपण विकासकामांवर लक्ष केंद्रित केल्याचे खताळ यांनी सांगितले. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पाठपुराव्यानंतर २५ कोटी रुपयांच्या ४ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, ही कामे तातडीने सुरू होणार आहेत. उर्वरित १० कामांनाही लवकरच मान्यता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​“तुम्ही मंत्री आणि आमदार असताना जे प्रश्न सुटले नाहीत, त्याचे श्रेय आता का घेताय?” असा सवाल करत आमदार खताळ यांनी विरोधकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नगरपालिकेच्या निवडणुकीतही माझ्यावर खालच्या थराचे आरोप करण्यात आले, पण संगमनेरची जनता अशा खोट्या आरोपांना आणि ‘क्रेडिट वॉर’ला कधीच बळी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान संगमनेरच्या राजकारणात सध्या विकासकामांच्या श्रेयावरून महायुती आणि विरोधक आमनेसामने आले असून, आमदार खताळ यांनी पुराव्यानिशी दिलेले प्रत्युत्तरात नंतर विरोधक काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !