अहिल्यानगर पोलिसांकडून ७ बांगलादेशी घुसखोर महिलावर कारवाई

संगमनेर Live
0
अहिल्यानगर पोलिसांकडून ७ बांगलादेशी घुसखोर महिलावर कारवाई

◻️ रुईछत्तीशी'त लपलेल्या घुसखोरांचा पर्दाफाश; गुप्तचर यंत्रणा आणि रेल्वेच्या मदतीने ‘मिशन हद्दपार’


संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) |​ अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने अवैध वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, जिल्ह्यात अनधिकृतपणे राहणाऱ्या ०७ घुसखोर बांगलादेशी महिलांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवून या महिलांना कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांच्या मायदेशी (बांगलादेश) हद्दपार करण्यात आले आहे.

​जिल्ह्यात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी दिनांक १७ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अहिल्यानगर तालुक्यातील रुईछत्तीशी आणि इतर भागात कोम्बिंग ऑपरेशन केले. या तपासणीदरम्यान संशयास्पद हालचालींवरून काही महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्या मूळच्या बांगलादेशच्या असल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी लागणारा व्हिसा किंवा कोणताही वैध पासपोर्ट आढळून आला नाही. त्यांनी भारतीय सीमा सुरक्षा दलाची नजर चुकवून, चोरट्या मार्गाने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याची कबुली दिली.

​या घुसखोर महिलांची ओळख पटल्यानंतर जिल्हा विशेष शाखेचे (DSB) पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने सूत्रे हलवत केंद्रीय गुप्तचर यंत्रणा (कोलकाता) आणि सीमा सुरक्षा बल (BSF, कोलकाता) यांच्याशी सातत्याने संपर्क साधला. या सततच्या पाठपुराव्याला यश येऊन १३ जानेवारी २०२६ रोजी वरिष्ठ कार्यालयाकडून संबंधित महिलांना हद्दपार करण्याचे आदेश प्राप्त झाले. या आदेशाची अंमलबजावणी करत पोलीस उपनिरीक्षक भरत बी. धुमाळ आणि त्यांच्या पथकाने कडेकोट बंदोबस्तात मध्य रेल्वेच्या मदतीने या ७ महिलांना सुरक्षितरीत्या बांगलादेश सीमेवर नेऊन कायदेशीररित्या हद्दपार केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, तसेच अंमलदार बी. जी. भिटे, मोडवे, तनपूरे, रमीज राजा, सोनाली भागवत व चालक मोरे यांनी पार पाडली. या कायदेशीर प्रक्रियेत जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर पटारे व पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, तर पोलीस उपनिरीक्षक भरत बी. धुमाळ यांच्या हद्दपारी पथकाने घुसखोरांना सीमेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !