हिंगणीच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील चोरीचा पर्दाफाश

संगमनेर Live
0
हिंगणीच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील चोरीचा पर्दाफाश

◻️ ‘एलसीबी’कडून ​संगमनेर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगार जेरबंद 

◻️ चांदीच्या दागिन्यांसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त


संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | ​श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातून चोरीला गेलेला चांदीचा मुखवटा शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. पोलिसांनी मंदिरांचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून १० लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक १३/०१/२०२६ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी हिंगणी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कुलूप तोडून गावकऱ्यांनी बसवलेला १ लाख ४८ हजार रुपये किमतीचा आणि १ किलो ८७३ ग्रॅम वजनाचा महादेवाच्या प्रतिकृतीचा चांदीचा मुखवटा चोरून नेला होता. या घटनेमुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना तातडीने तपासाचे आदेश दिले होते. एलसीबीच्या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढली असता, एका या सराईत गुन्हेगाराचे नाव समोर आले. पथकाने सलग ४ दिवस आरोपीचा माग काढला. अखेर आरोपी संगमनेर कडून पारनेरच्या दिशेने येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, टाकळीढोकेश्वर परिसरात सापळा रचण्यात आला.

पोलिसांनी सापळा रचून दोघाना ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या फरार साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ​पोलीसांनी या धडक कारवाईत आरोपींकडून चांदीचा मुखवटा, गुन्ह्यात वापरलेली गाडी, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेले हत्यारे असा एकूण १० लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तर, ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहमदनगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यासह संगमनेर, श्रीगोंदा, बेलवंडी, पारनेर, राजुर, आश्‍वी आणि नेवासा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, भीमराज खर्से, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, आकाश काळे, योगेश कर्डीले आणि अरुण मोरे यांच्या पथकाने केली. तर, पुढील तपासासाठी आरोपींना बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !