महिलांनो, स्वतःला कमी लेखू नका; मिळालेल्या संधीचे सोने करा - सौ. नीलम खताळ
◻️ जनसेवा फाउंडेशनकडून साकूर गटातील २१ बचत गटांना साहित्य वाटप
संगमनेर LIVE | केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. महिलांमध्ये अंगभूत गुण असतात, त्यांनी कधीही स्वतःला कमी न लेखता एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण करावी आणि मिळालेल्या संधीचे सोने करून प्रगती साधावी, असे आवाहन सौ. नीलम खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील २१ महिला बचत गटांना जनसेवा फाउंडेशनच्या वतीने साहित्याचे वाटप करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमात साकूर जिल्हा परिषद गटातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे पाठबळ देण्यात आले. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक बचत गटाला ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे व्यावसायिक साहित्य किट प्रदान करण्यात आले असून, या किटमध्ये दोन पिठाच्या गिरण्या, दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, पनोलायझर आणि दोन पॅकिंग मशीन यांसारख्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा समावेश करण्यात आला आहे. या साहित्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा उद्योग उभारून आत्मनिर्भर होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
सौ. खताळ यांनी यावेळी लोकप्रतिनिधींच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, साकूर गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमांमुळे महिलांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल, असे नमूद केले.
दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि महिला बचत गटातील सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या मदतीमुळे साकूर परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.