संगमनेरची लेक संयम पथावर; हर्षा पारख यांचा ऐश्वर्याकडून वैराग्याकडे प्रवास!

संगमनेर Live
0
संगमनेरची लेक संयम पथावर; हर्षा पारख यांचा ऐश्वर्याकडून वैराग्याकडे प्रवास!

◻️ संयम, तप आणि त्याग: हर्षा पारख स्वीकारणार जैन भागवती दीक्षा!

◻️ २५ जानेवारीला साधू - साध्वींच्या प्रमुख उपस्थितीत रंगणार भक्तीचा महाकुंभ


​संगमनेर LIVE | संगमनेरच्या धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या पारख कुटुंबातील कन्या कुमारी हर्षा पारख यांनी संसारातील भौतिक सुखांचा त्याग करून संयमाचा मार्ग स्वीकारण्याचा महान निर्णय घेतला आहे. येत्या रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी संगमनेरच्या पावन भूमीत त्यांचा भव्य आणि ऐतिहासिक ‘जैन भागवती दीक्षा महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

​प्रसिद्ध व्यापारी शैलेश पारख यांची सुकन्या असलेल्या हर्षा पारख यांच्या मनात बालपणापासूनच धार्मिक संस्कार रुजले होते. वैराग्य भावनेचा उदय झाल्याने त्यांनी मानवी जीवनातील नश्‍वर सुखांचा त्याग करून तप, त्याग आणि साधनेच्या खडतर मार्गावर चालण्याचा संकल्प केला असून, या निर्णयामुळे संपूर्ण जैन समाजात आनंदाचे आणि आदराचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या ऐतिहासिक दीक्षा महोत्सवासाठी जैन धर्मातील अनेक प्रखर तेजस्वी संत आणि साध्वींचे आगमन संगमनेरमध्ये होणार आहे. जैन श्रमण संघाचे 'अर्हम विज्जा' प्रणेते उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराज यांच्या मंगल सान्निध्यात आणि चतुर्विध संघाच्या साक्षीने हा दीक्षा विधी पार पडणार आहे. गुरुदेवांच्या अमृतवाणीने आणि आशीर्वादाने हर्षा पारख यांना भागवती दीक्षा प्रदान केली जाईल. 

या सोहळ्यासाठी वाणीचे जादूगर रमणिक मुनीजी महाराज, मधुर कंठी तीर्थेश ऋषीजी महाराज, सरलमना अचल ऋषीजी महाराज, कैवल्यधाम प्रेरक कैवल्य रत्नाश्री महाराज यांसह प. पू. विभक्ती श्रीजी महाराज, प. पू. विचक्षणजी महाराज, प. पू. करुणाजी महाराज, प. पू. पुण्यशीलाजी महाराज, प. पू. ज्ञानप्रभाजी महाराज आणि प. पू. हिमानीजी महाराज यांसारख्या थोर साध्वींचे मंगल वास्तव्य शहराला लाभणार आहे.

​दीक्षा महोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणांहून पूज्य संत-सतियांचे आगमन झाल्याने संपूर्ण संगमनेर नगरी भक्ती आणि साधनेच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. सध्या शहरात मधुर वक्ता व अनुशासनप्रिय प. पू. सम्यकदर्शनाजी महाराज (आदि ठाणा ३), ज्ञान आराधिका प. पू. डॉ. श्री प्रणवदर्शनाजी महाराज आणि मधुर वक्ता प. पू. श्री ईशदर्शनाजी महाराज (आदि ठाणा २) यांचे वास्तव्य असून त्यांच्या पवित्र सान्निध्यामुळे वातावरण मंगलमय झाले आहे.

दरम्यान ​या अभूतपूर्व आणि प्रेरणादायी धार्मिक दीक्षा महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी सकल जैन बांधवांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ संगमनेर, जैन सोशल लेडीज ग्रुप व जैन युथ फेडरेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !