आश्वीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा जागर!
◻️ आश्वी महाविद्यालयात युवा दिन व पत्रकार दिन उत्साहात साजरा
संगमनेर LIVE (आश्वी) | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिन तसेच बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ स्थानिक पत्रकारांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रवरा शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी यमन पुलाटे यांच्यासह पत्रकार संजय गायकवाड, योगेश रातडीया, राजेश गायकवाड, अनिल शेळके यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य देविदास दाभाडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांतून घडलेले छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असलेला चारित्र्यसंपन्न, कर्तृत्ववान व राष्ट्रनिष्ठ नवयुवक याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन करून राष्ट्रनिष्ठेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. अमित शिंदे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्र उभारणीसाठीच्या विचारसरणीवर प्रकाश टाकला. राजमाता जिजाऊंनी दिलेले संस्कार, मूल्ये आणि राष्ट्रभक्तीची शिकवण आजही समाजमनासाठी तितकीच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सीताराम अनाप यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता खळदकर व प्रा. अश्विनी आहेर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. मेनीनाथ औताडे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. सुवर्णा जाधव, प्रा. नीतू मांढरे, प्रा. संतोष वर्पे यांसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.