अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करा - जिल्हाधिकारी
◻️ जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेर तालुक्यात बांधावर जाऊन केली ई- पीक पाहणी
संगमनेर LIVE | जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज संगमनेर तालुक्याचा दौरा करून प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. अवैध व्यवसायांबाबत प्रशासनाला कठोर भूमिका घेण्याचे निर्देश दिले. या दौऱ्यात त्यांनी साकुर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मियावाकी प्रकल्प, वनराई बंधारे तसेच प्रस्तावित स्मशानभूमीच्या जागेची पाहणी केली. याशिवाय कासारा दुमाला येथील महिला बचत गटाच्या दुग्ध प्रक्रिया केंद्राला आणि निमोण येथील नियोजित सौरऊर्जा प्रकल्पाच्या जागेला त्यांनी भेट दिली.
प्रशासकीय कामांच्या पाहणीसोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी साकुर व खंडेरायवाडी येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन रब्बी पिकांची ई-पीक पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ई-पीक पाहणी व ॲग्रीस्टॅक योजनेचे काम मोहीम स्तरावर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
संगमनेर शहरातील श्वान निर्बीजीकरण केंद्र, ट्रक टर्मिनल व एमआयडीसीमधील उद्योजकांच्या समस्यांबाबतही त्यांनी आढावा घेतला.
तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध वाळू उपसा व गौण खनिज उत्खननाबाबत त्यांनी सूचना दिल्या. वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए किंवा मोक्का अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दिले. या दौऱ्याप्रसंगी तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.