स्वतःला कमी लेखू नका, संधीचे सोने करा - सौ. नीलम खताळ
◻️ जनसेवा फाऊंडेशनकडून ११ बचतगटाना ३५ लाखांचे साहित्य वितरीत
संगमनेर LIVE | नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील अंभोरे पंचायत समिती गणातील ११ महिला बचतगटांना तब्बल ३५ लाख रुपये किमतीचे उद्योग साहित्य वितरित करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. अंभोरे गणातील डिग्रस, मालुंजे, कोळवाडे, पिंपरणे, रायते, वाघापूर या गावांमधील ११ महिला बचतगटांना प्रत्येकी ३ लाख ५० हजार रुपये किमतीची ‘साहित्य किट’ देण्यात आली.
भाजपचे संदीप घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने देण्यात आलेल्या या किटमध्ये दोन पिठाच्या गिरण्या, दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, पॅनोलायझर आणि दोन पॅकिंग मशीन यांसारख्या आधुनिक साहित्याचा समावेश आहे. हे प्रगत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचे गृहउद्योग सुरू करणे आणि ते यशस्वीरित्या चालवणे अधिक सोपे होणार आहे.
दरम्यान याप्रसंगी भाजपचे आश्वी मंडळ अध्यक्ष गोकुळ दिघे, भाजपचे सरचिटणीस संदीप घुगे, मालुंजेच्या सरपंच सौ. सुवर्णा घुगे, जोर्वेच्या सरपंच सौ. प्रीती दिघे, ग्रामसेविका सौ. रुपाली कहाणे, संपत खेमनर, शरद भालेराव, विजय डोंगरे, जनसेवा फाऊंडेशनच्या प्रकल्प अधिकारी रुपाली लोंढे यांच्यासह बचतगटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
“केंद्र व राज्यातील महायुती सरकारने महिला बचतगटांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःला सिद्ध करावे. स्वतःला कधीही कमी लेखू नये. महिलांमध्ये अनेक सुप्त गुण असतात, ते आत्मसात करून मिळालेल्या संधीचे सोने करावे. पालकमंत्री नामदार विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ हे सदैव ‘लाडक्या बहिणींच्या’ पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.” अशी ग्वाही सौ. नीलम खताळ यांनी दिली.