रेल्वे प्रश्नी चर्चेचे आश्वासन न पाळल्यास आंदोलन तीव्र करणार
◻️ कोतुळ येथे ४ हजार विद्यार्थ्याची रॅली; मुख्यमंत्र्यांना पाठवली हजारो पत्रे
संगमनेर LIVE (अकोले) | नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे देवठाण - बोटा स्टेशनसह पूर्वीच्या सर्वेक्षणाप्रमाणेच व्हावी, या प्रमुख मागणीसाठी कोतुळ (ता. अकोले) येथे भव्य ‘रेल्वे हक्क परिषद’ उत्साहात पार पडली. परिषदेपूर्वी कोतुळ शहरातून ४ हजार विद्यार्थ्याची ऐतिहासिक रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये नव्या पिढीच्या भवितव्यासाठी विद्यार्थ्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून हजारो पत्रे लिहिली. ही पत्रे एका मोठ्या मिरवणुकीद्वारे पोस्ट पेटीमध्ये टाकण्यात आली. "रेल्वे आमच्या हक्काची, नव्या पिढ्यांच्या विकासाची" अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण कोतुळ शहर दुमदुमून गेले होते.
या परिषदेचे अध्यक्षस्थान कोतुळ पंचक्रोशीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी देशमुख यांनी भूषविले. बोटा येथील रास्ता रोको आंदोलनावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १९ तारखेच्या आत मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिलेली मुदत उलटूनही अद्याप चर्चेसाठी वेळ न मिळाल्याने आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “मुख्यमंत्री वेळ देणार नसतील आणि पालकमंत्री दिलेला शब्द पाळणार नसतील, तर आंदोलन तीव्र करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही,” असे ठाम मत विनय सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.
सिन्नर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यानीही या परिषदेला हजेरी लावून आपला पाठिंबा दर्शवला. ३१ जानेवारी रोजी सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने समृद्धी महामार्गावर मोठे ‘रास्ता रोको' आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण सिन्नर समितीने अकोले समितीला दिले आहे. बोटा-बेलापूर परिसरातील रेल्वे कृती समितीचे नेते संतोष फापाळे आणि सतीश फापाळे यांनीही याप्रसंगी इशारा दिला की, जर प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही, तर यापेक्षाही मोठे जनआंदोलन उभे केले जाईल.
किसान सभेचे राज्यसचिव डॉ. अजित नवले यांनी यावेळी आगामी आंदोलनाची रूपरेषा मांडली. २५ जानेवारी रोजी नाशिक ते मुंबई असा भव्य ‘लॉन्ग मार्च’ काढण्यात येणार असून, याद्वारे मुख्यमंत्र्यांकडे रेल्वेच्या मागण्यांचे निवेदन दिले जाईल. १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय बजेटपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व तालुके एकाच वेळी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करतील, असा इशारा डॉ. नवले यांनी दिला.
या परिषदेत डॉ. संदीप कडलग, तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे, राजु देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, कुंडलिक गंभिरे, हरिभाऊ तांबे, मनोज देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची भाषणे झाली. कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी परिषदेचे सूत्रसंचालन केले, तर मनोज देशमुख यांनी आभार मानले.
विनोद देशमुख, अभिजित देशमुख, अजित चौधरी, सागर शेटे, उमेश देशमुख, बाळासाहेब भोर, गौरव शेळके, डॉ. दत्ता लहामटे, रवींद्र आरोटे, मच्छिंद्र देशमुख, सुनील गिते यांच्यासह कोतुळमधील ग्रामस्थांनी ही परिषद यशस्वी करण्यासाठी विशेष कष्ट घेतले. तर, प्रकाश साबळे, रवी पवार, रमेश शिरकांडे, राजू गंवादे यावेळी उपस्थित होते.