संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर एलसीबीची महिण्याभरात चौथी मोठी कारवाई

संगमनेर Live
0
संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर एलसीबीची महिण्याभरात चौथी मोठी कारवाई


◻️ ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त; लाकूड गिरणीच्या आडून चालणारा गोमांस तस्करीचा अड्डा उध्वस्त


संगमनेर LIVE | शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उगारलेला बडगा चांगलाच परिणामकारक ठरत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संगमनेर शहरात एका मोठ्या कारवाईत ६ हजार किलो गोमांस आणि ९ जिवंत जनावरांसह तब्बल ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त करून खळबळ उडवून दिली आहे. जुना जोर्वे रोडवरील लाकूड गिरणीच्या आडून चालणाऱ्या या कत्तलखान्यावर मध्यरात्री धाड टाकण्यात आली, मात्र पोलिसांची चाहूल लागताच पाच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

​अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथक संगमनेर शहरात गस्त घालत होते. शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना जमजम कॉलनी परिसरात ‘न्यु सेवा सॉ मिल’ समोर एका वाड्यात अवैध कत्तल सुरू असल्याची पक्की माहिती मिळाली. 

या माहितीच्या आधारे एलसीबीचे पथक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. पथक घटनास्थळी पोहचताच तिथे काही इसम जनावरांची कत्तल करून मांस वाहनात भरताना आढळून आले. मात्र, पोलिसांच्या छाप्याची कुणकुण लागताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत तिथून पोबारा केला.

​या धडक कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल ३३ लाख ३१ हजार रुपयांचा मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये १८ लाख रुपये किमतीचे ६ हजार किलो गोमांस, १२ लाख रुपये किमतीच्या दोन पिकअप गाड्या, ३ लाख ३० हजार रुपये किमतीची ९ जिवंत गोवंशीय जनावरे आणि १ हजार रुपये किमतीचे दोन सुरे व एका कुऱ्हाडीचा समावेश आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ व महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमान्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्ह्यात समावेश असलेले सर्व संशयित आरोपी सध्या फरार आहेत.

​स्थानिक गुन्हे शाखेने मागील एका महिन्यात म्हणजेच २५ डिसेंबर २०२५ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत एलसीबीने संगमनेर हद्दीत अवैध कत्तलखान्यांवर ४ मोठे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये १९ आरोपींवर कारवाई करत एकूण ६३ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेर शहर हद्दीतील अवैध कत्तलखाने समूळ नष्ट करण्याची मोहीम यापुढेही अशीच तीव्र राहील, असे स्थानिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, तसेच अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ यांच्यासह संगमनेर येथील बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे आणि सुनील ढाकणे यांच्या पथकाने केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !