केंद्राच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा - खासदार भाऊसाहेब वाकचौरे
◻️ योजनांची गतीने अंमलबजावणी करा - खासदार लंके
◻️ जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करताना प्रत्येक अधिकाऱ्याने परस्पर संवाद व समन्वय राखून योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यापर्यत पोहोचवावा तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले. तर केंद्र पुरस्कृत योजनांची जिल्ह्यात गतीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना सहअध्यक्ष खासदार निलेश लंके यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहअध्यक्ष खासदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर आदी उपस्थित होते.
खासदार वाकचौरे यांनी विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा विभागनिहाय आढावा घेतला. योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात परिणामकारक ठरेल यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्रस्तरावर सक्रिय राहावे, लाभार्थ्याच्या अडचणी तत्काळ समजून घेऊन त्यांचे निराकरण करावे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या निराधार योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्याला वेळेत मिळावा यासाठी समित्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात. एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. विजेची वाढती मागणी लक्षात घेता सौर ऊर्जेच्या वापरावर भर द्यावा. मागणीनुसार पथदिवे उपलब्ध करून द्यावेत. सफाई कामगारांना शासन निर्देशानुसार सर्व साहित्य देऊन त्यांना वेळेत वेतन मिळेल याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
विविध विभागांतील कामांमध्ये परस्पर समन्वय राहावा यासाठी नियमित बैठकांद्वारे प्रगतीचा आढावा घ्यावा, कामकाजात पारदर्शकता ठेवावी व वेळेत उद्दिष्टपूर्ती करावी, असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करावी. जनहिताच्या व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विविध योजना राबविण्यात याव्यात. काही अडचणी असतील तर पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
खासदार निलेश लंके यांनी कृषी विभागाच्या योजना तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावी. निराधार योजनेसाठी प्रलंबित बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. ‘मागेल त्याला सोलर’ योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा व दिरंगाई करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी. आरडीएस योजनेला गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
अहिल्यानगर शहराला नळवाहिनीद्वारे गॅस पुरवठ्यासाठीची कामे गतीने पूर्ण करावीत. ई-पॉस प्रणालीद्वारे धान्य वितरणात येणाऱ्या अडचणी त्वरेने दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.