शहागडाचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीने अभ्यासावा - बाळासाहेब थोरात
◻️ अमृतवाहिनी आणि पेमगिरी सोशल फाउंडेशनच्या वतीने व्याख्यान संपन्न
संगमनेर LIVE | छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहेत. त्यांचे जीवन चरित्र प्रत्येकासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असून, महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात पेमगिरी येथील शहागडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पेमगिरी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वराज्य संकल्पक शहाजीराजे वसा आणि वारसा’ या विषयावरील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, हिंदवी स्वराज्यामध्ये पेमगिरीच्या शहागडाचे स्थान अत्यंत मोठे असून इतिहास अभ्यासताना खरी सुरुवात याच गडापासून होते. शिवनेरी ते रायगड या गौरवशाली प्रवासात अनेक किल्ल्यांनी स्वराज्याला भक्कम केले. आजच्या काळातही एकता आणि महाराष्ट्र धर्माचा हा जाज्वल्य विचार पुढे नेण्यासाठी सर्व समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची नितांत गरज आहे. शहागडावरून मिळालेली प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन युवकांनी राष्ट्र उभारणीच्या कामात सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
इतिहास संशोधक डॉ. गणेश राऊत यांनी शहाजीराजांच्या योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. विविध शाह्यांच्या जोखडातून जनतेला मुक्त करून स्वतःचे राज्य निर्माण करण्याची संकल्पना शहाजीराजे यांनी सर्वप्रथम शहागडावरच मांडली होती. त्यांनी मुर्तुजा आदिलशहा याला गादीवर बसवून ज्या पद्धतीने कारभार पाहिला, त्यातूनच स्वराज्याची बीजे रोवली गेली.
समता, बंधुता आणि लोकशाहीच्या विचारातून सर्वसामान्यांचे स्वराज्य उभे राहावे, हे त्यांचे स्वप्न पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष साकारले. लोकशाहीची मूळ संकल्पना देणाऱ्या या स्वराज्याने केवळ देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक नवी दिशा दिली असून हीच प्रेरणा घेऊन युवकांनी काम केले पाहिजे, असे डॉ. राऊत यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान या व्याख्यान कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, इतिहासप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.