पारनेरमध्ये दहा किलो ड्रग्ज कुणाच्या घरात होते?
◻️ डॉ. सुजय विखे यांच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापले
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | पुणे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे आता थेट अहिल्यानगरपर्यत पोहोचल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली असून, या घटनेनंतर राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेत गंभीर आरोप केले आहेत आणि अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित केले.
पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात नुकतेच एक ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले होते, ज्याचा तपास करताना अहिल्यानगर एलसीबीत कार्यरत असलेल्या शामसुंदर गुजर या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव समोर आले. गुजर हा पूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होता आणि आता त्याला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दल आणि गुन्हेगारांचे असलेले लागेबांधे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी या अटकेवर प्रतिक्रिया देताना थेट पोलीस अधीक्षकांनाच प्रश्न विचारले आहेत. वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या आणि ज्याच्या विरोधात तक्रारी होत्या, अशा पोलिसाची बदली थेट स्थानिक गुन्हे शाखेत नेमकी कुणाच्या सांगण्यावरून झाली, असा सवाल त्यांनी विचारला आहे. यावरून या पोलिसाच्या मागे कोणातरी ‘बड्या नेत्या’चा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
विखे पाटील यांनी या प्रकरणातील ‘१० किलो ड्रग्ज’च्या संशयास्पद पैलूवरही प्रकाश टाकला. पारनेरमधील दोघांच्या घरी हे ड्रग्ज ठेवण्यात आले होते, पण पोलीस त्यांची नावे का लपवत आहेत आणि ते नक्की कुणाचे कार्यकर्ते आहेत, हे स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यांच्या घरात हे ड्रग्ज सापडले, त्यांचे नाव गुन्ह्यात येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात अर्धा तास बसून मध्यस्थी करणारा तो व्यक्ती कोण होता, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. विखे पाटील यांनी कोणाचेही नाव थेट घेतले नसले, तरी त्यांचा रोख दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्याकडे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या गंभीर प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना विखे पाटील म्हणाले की, पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता पत्रकार परिषद घेऊन सर्व सत्य जनतेसमोर मांडावे. जर पोलिसांनी ही नावे उघड केली नाहीत, तर पुढच्या आठ दिवसात आपण स्वतः पुराव्यांसह या प्रकरणातील सर्व सूत्रधारांची नावे उघड करू, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
त्याचप्रमाणे, पारनेरमध्ये लोकसभा निकालानंतर झालेल्या राड्याचा आणि एका गर्भवती महिलेला झालेल्या मारहाणीचाही त्यांनी निषेध केला असून, लोकप्रतिनिधींच्या कुटुंबाकडून होणारी अशी कृत्ये निंदनीय असल्याचे सांगत न्यायालयावर विश्वास व्यक्त केला आहे.