मुमुक्षू हर्षा पारख यांचा ​ऐतिहासिक दीक्षा सोहळा संपन्न!

संगमनेर Live
0
मुमुक्षू हर्षा पारख यांचा ​ऐतिहासिक दीक्षा सोहळा संपन्न!

◻️ ‘साध्वी राजुलदर्शनजी म.सा.’ म्हणून आता ओळखल्या जाणार

◻️ संगमनेर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगलमय सोहळा संपन्न 


​संगमनेर LIVE | संगमनेर शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जावा असा “भव्य जैन भागवती दीक्षा महोत्सव” रविवारी (दि. २५) अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. जैन श्वेतांबर स्थानकवासी संप्रदायाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात मुमुक्षू हर्षा शैलेश पारख यांनी सांसारिक सुखाचा त्याग करून जैन साध्वीची दीक्षा ग्रहण केली. दीक्षेनंतर आता त्या ‘साध्वी राजुलदर्शनजी म.सा.’ म्हणून ओळखल्या जाणार आहेत.

​या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संगमनेर महाविद्यालयाचे प्रांगण जैन समाज बांधवांनी फुलून गेले होते. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून हजारो भाविक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी दाखल झाले होते. जैन श्रमण संघाचे अर्हम विज्जा प्रणेते उपाध्याय प्रवर प्रवीणऋषीजी महाराज यांनी चतुर्विध संघाच्या साक्षीने मुमुक्षू हर्षा पारख यांना विधीवत भागवती दीक्षा प्रदान केली.
​सजग संथारा साधिका परमपूज्य डॉ. प्रियदर्शनाजी महाराज यांच्या ६८ दिवसांच्या प्रदीर्घ संथारा काळात मुमुक्षू हर्षा पारख यांना वैराग्याची प्रेरणा मिळाली होती. तेव्हापासून त्यांनी दीक्षेचा दृढ संकल्प केला होता, जो आज पूर्णत्वास गेला. आता त्या साध्वी प्रणवदर्शनाजी म.सा. व ईशदर्शनाजी म.सा. यांच्या सान्निध्यात आपले संयमी जीवन व्यतीत करणार आहेत.

​संगमनेर शहरातील जैन श्वेतांबर स्थानकवासी संप्रदायातील ही पहिलीच दीक्षा असल्याने मागील पंधरा दिवसांपासून शहरात मंगलमय वातावरण होते. या काळात कुंकुम, मेहंदी-हळदी, केसर घोटाई, मातृ-पितृ वंदन आणि भावुक विदाई समारंभ अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

शहराच्या मुख्य भागातून काढण्यात आलेल्या भव्य आणि दिव्य वरघोड्याने संपूर्ण संगमनेर नगरीला भक्तिरसात न्हाऊन काढले. या सोहळ्याच्या निमित्ताने रमणिक मुनीजी महाराज, मधुर कंठी तीर्थेश ऋषीजी महाराज, सरलमना अचल ऋषीजी महाराज, कैवल्यधाम प्रेरक कैवल्य रत्नाश्री महाराज यांच्यासह विभक्तीश्रींजी महाराज, परमपूज्य विचक्षणाजी महाराज, करुणाश्रीजी महाराज, पुण्यशीलाजी महाराज, ज्ञानप्रभाजी महाराज व हिमानीजी महाराज या विद्वान साधू-साध्वींचे संगमनेरमध्ये विशेष आगमन झाले होते.

​दीक्षा ग्रहण केल्यानंतर भावना व्यक्त करताना साध्वी राजुलदर्शनजी म.सा. म्हणाल्या, “आज माझे जीवनस्वप्न पूर्ण झाले आहे. परमात्म्याच्या विद्यापीठात मला प्रवेश मिळाला असून, माता-पिता आणि पारख परिवाराने मला दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी आज संयमाच्या मार्गावर चालू शकले आहे.” याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान या महामहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, संगमनेर, जैन सोशल महिला समूह व जैन युथ फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. ​संयमाचा हा मार्ग अखिल मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरो, अशी भावना याप्रसंगी उपस्थित भाविकांनी व्यक्त केल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !