समृद्ध संगमनेरसाठी लोकशाही आणि समतेचे विचार जोपासा - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
समृद्ध संगमनेरसाठी लोकशाही आणि समतेचे विचार जोपासा - बाळासाहेब थोरात

◻️अमृत उद्योग समूहाच्या झेंडावंदन सोहळ्यात स्वातंत्र्यलढ्यातील सेनानींच्या स्मृतींना उजाळा


​संगमनेर LIVE | “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे प्रत्येक भारतीयाला समतेचा अधिकार प्राप्त झाला. आपली राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ असून, ही लोकशाही आणि घटना टिकवून ठेवणे ही आज प्रत्येक सुजाण नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित अमृत उद्योग समूहाच्या सामूहिक झेंडावंदन सोहळ्यात ते बोलत होते.

​यावेळी बोलताना थोरात यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा दिला. ते म्हणाले की, १९४२ च्या चले जाव चळवळीमध्ये देशातील सर्व स्तरांतील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या आंदोलनात संगमनेर तालुक्यातील तीर्थरूप सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, डॉ. अण्णासाहेब शिंदे, धर्मा पोखरकर, कॉम्रेड पी. बी. कडू पाटील, पी. जी. भांगरे आणि रावसाहेब शिंदे यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी मोलाचे योगदान दिले. 

या लढ्यात सहकारमहर्षी दादांना दीड वर्षाचा कारावासही भोगावा लागला होता. अशा थोर परंपरेतून मिळालेले स्वातंत्र्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना ही बंधुता, समता आणि धर्मनिरपेक्षतेचा विचार देणारी आहे. हा घटनात्मक विचार जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.

​स्वातंत्र्योत्तर काळात देशाने शिक्षण, कृषी आणि विज्ञान या सर्वच क्षेत्रांत मोठी प्रगती केली असून यात महाराष्ट्राचा वाटा मोलाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्थांनी राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून येथील शिक्षण संस्था गुणवत्तेच्या जोरावर अग्रगण्य ठरल्या आहेत. 

निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम पूर्ण झाल्यामुळे आज संपूर्ण तालुक्यात समृद्धीचे वारे वाहत आहे. केवळ आर्थिकच नव्हे, तर विचारांची समृद्धी येण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी सर्वानी कटिबद्ध राहणे आवश्यक असून, तरुण विद्यार्थ्यांनी देखील नवनवीन क्षेत्रांमध्ये आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !