ड्रग्ज प्रकरणातील आरोपी सोबत खासदार लंके यांचे फोटो व्हायरल झाल्यामुळे खळबळ

संगमनेर Live
0
                       **वायरल फोटो**

ड्रग्ज प्रकरणातील आरोपी सोबत खासदार लंके यांचे फोटो व्हायरल झाल्यामुळे खळबळ 

◻️ ‘तो मी नव्हेच’ म्हणणाऱ्या खासदार लंकेवर विरोधकांची टिकेची झोड

संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे आता थेट अहिल्यानगरपर्यत पोहोचली असून, या प्रकरणाने मोठे राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणातील आरोपी आणि खासदार निलेश लंके यांचे एकत्रित फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

​शिरुर येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत ड्रग्ज साठा पकडला होता. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरुरमधील गॅरेजचालकाकडे सापडलेले हे ड्रग्ज पारनेर तालुक्यातील आरोपीने पुरवल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, आरोपी हा खासदार निलेश लंके यांचा अत्यंत जवळचा आणि कट्टर कार्यकर्ता असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

​पोलिसांच्या एफआयआरमध्ये नाव असलेला आरोपी आणि खा. निलेश लंके यांचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये केवळ खासदारच नव्हे, तर त्यांच्या पत्नी या देखील आरोपीच्या कुटुंबासोबत दिसत असल्याने हे फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यामुळे “तो मी नव्हेच” अशी भूमिका घेणाऱ्या खासदार लंकेंना विरोधकांनी चांगलेच घेरले आहे.

​माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि राजकीय हस्तक्षेपवर गंभीर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, ​“ड्रग्ज प्रकरणातील जो म्होरक्या पूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात होता आणि ज्याच्यावर गंभीर आरोप होते, त्याची थेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत (LCB) बदली कशी झाली? त्याला तिथे घेण्यासाठी कुणी 'शिफारस' केली होती, हे पोलिसांनी जाहीर करावे.”

​एवढेच नव्हे तर, “आरोपपत्रात आरोपीचे नाव येऊ नये, यासाठी एक बडा नेता अर्धा तास पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसला होता,” असा खळबळजनक आरोपही विखे पाटलांनी केला आहे. त्यामुळे हा ‘नेता’ कोण? यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

खासदार नीलेश लंके यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींसोबत नाव जोडले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पुण्यातील कुख्यात डॉन गजा मारणेचा सत्कार स्वीकारल्याने ते मोठे वादात सापडले होते. तसेच, कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या सिस्पे इन्फिनीटीच्या संचालकांना जाहीरपणे “हे आमचे पाहुणे आहेत,” असे संबोधल्यानेही त्यांच्यावर टीका झाली होती.

​दरम्यान दोन दिवसांपूर्वीच लंकेंनी आपले नाव गोवले जात असल्याचा दावा केला होता, परंतु आता थेट फोटो समोर आल्याने महायुतीच्या कार्यकर्त्याकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. आता यावर खासदार लंके काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !