प्रजासत्ताक दिनी मंत्री महाजनाना भाषणात बाबासाहेबांच्या नावाचा विसर

संगमनेर Live
0
प्रजासत्ताक दिनी मंत्री महाजनाना भाषणात बाबासाहेबांच्या नावाचा विसर

◻️ वनविभागाच्या महिला रणरागिणींनी जागेवरचं झापले!


संगमनेर LIVE (​नाशिक) | ​प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमातच आपला तीव्र निषेध नोंदवला. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन आपले भाषण करत असताना त्यांनी विविध महापुरुषांचे स्मरण केले, मात्र यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख टाळला. ही बाब लक्षात येताच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वनरक्षक दर्शना सौपुरे आणि माधुरी जाधव या महिला कर्मचाऱ्यांनी भर कार्यक्रमात घोषणाबाजी सुरू करत “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का वगळले?“ असा थेट सवाल उपस्थित केला.

​महिला कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांचे तोंड दाबून त्यांना घोषणाबाजी करण्यापासून रोखण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. या घटनेमुळे शासकीय सोहळ्यात काही काळ मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही या महिला कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम होत्या. 

ज्या संविधानामुळे आज हा लोकशाहीचा सोहळा साजरा होत आहे, त्याच संविधानकारांचे नाव शासकीय भाषणात न येणे ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आम्हाला केवळ आमचा हक्क आणि सन्मान हवा असून, यासाठी नोकरी जाण्याची किंवा निलंबनाची भीती वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला स्वाभिमान व्यक्त केला. बाबासाहेबांची ओळख पुसू पाहणाऱ्यांविरुद्ध आम्ही वेळोवेळी आवाज उठवत राहू, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

​या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या धाडसी भूमिकेचे जोरदार समर्थन केले असून "आम्ही आमच्या या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत," असे जाहीर केले आहे. महापुरुषांचा अवमान किंवा त्यांना डावलण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला. नाशिक कमिटीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या महिलांना धीर दिला आणि त्यांचा विशेष सन्मान देखील केला.

“पालकमंत्री आज ज्या पदावर आहेत, ते देखील केवळ संविधानामुळेच आहेत, हे त्यांनी विसरता कामा नये," असे टोकदार विधान करत दर्शना सौपुरे यांनी मंत्र्यांच्या विस्मरण वृत्तीवर ताशेरे ओढत चांगली कान उघडी केली आहे‌.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !