“विकसित आणि सशक्त भारत उभारणीचा संकल्प करा" - आमदार अमोल खताळ
◻️ धांदरफळ खुर्द येथे उत्साहात झेंडावंदन आणि स्व. बी. जे. खताळ पाटील सभागृहाचे उद्घाटन
संगमनेर LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘विकसित भारत’ ही संकल्पना मांडली असून, देशाला जागतिक स्तरावर महासत्ता बनवण्यासाठी आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग मोलाचा आहे. येणाऱ्या काळात आपण सर्वानी मिळून सशक्त भारताचा संकल्प करावा, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे आयोजित विविध सार्वजनिक कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात उत्साही वातावरणात झाली. धांदरफळ खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते, तर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच लताबाई खताळ यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यानी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन केले. विशेषतः ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यानी सादर केलेली परेड आणि शिस्तबद्ध कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली. या संचलनाद्वारे विद्यार्थ्यांनी आमदार खताळ यांना मानवंदना दिली.
या सोहळ्यात गावातील गुणवंतांचा यथोचित गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या आरुशी कोकणे व वेदांत घुले या विद्यार्थ्याना ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच क्रीडा क्षेत्रात गावाची मान उंचावणाऱ्या दिव्या खताळ हिची फुटबॉलपटू म्हणून निवड झाल्याबद्दल आमदारांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमादरम्यान धांदरफळ ग्रामपंचायत कार्यालयातील नूतन सभागृहाचे लोकार्पणही करण्यात आले. हे सभागृह माजी मंत्री स्व. बी. जे. खताळ पाटील यांच्या नावाने ओळखले जाणार असून, त्याचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी भास्करराव खताळ, उपसरपंच संदीप ठोंबरे, ग्रामसेवक राजेश गुंजाळ, निशा कोकणे, डॉ. राजेंद्र खताळ, विक्रम खताळ, सीमा लांडगे, वैशाली मुळे, स्मिता कुशारे, ॲड. विजय खताळ, दत्तू कोकणे, प्रशांत कचेरे, प्रियंका घुले, मिलिंद खताळ, सतीश कोकणे, भास्कर खताळ, मुरलीधर खताळ, अतुल खताळ, सागर खताळ, मुख्याध्यापक शाहीन मणियार, देविदास कोकणे, अजित खताळ, अमोल खताळ, नितीन खताळ, सुरज खताळ, उमेश कोकणे आदि उपस्थित होते.
दरम्यान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीता सावंत यांनी कवायतींचे संचालन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गायकवाड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ज्योती घोडे यांनी मानले.