तीर्थरूप दादा : लोकसेवेचा दीपस्तंभ आणि मूल्यांचे विद्यापीठ
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शब्दांतून व्यक्त झालेली कृतज्ञता
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि सहकार चळवळीत ज्या व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाचा अजरामर ठसा उमटवला, त्यात स्व. भाऊसाहेब संतुजी थोरात ऊर्फ ‘तीर्थरूप दादा’ यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. स्वातंत्र्य चळवळीच्या मुशीत घडलेले दादांचे व्यक्तिमत्त्व केवळ एका तालुक्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते नव्या पिढीसाठी मूल्यांचे चालते-बोलते विद्यापीठ होते.
स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर, दादांनी समाजाच्या सर्वागीण विकासासाठी ‘सहकार’ हा मार्ग निवडला. स्व. डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या सोबतीने त्यांनी सहकाराला नवी दिशा दिली. त्यांच्यासाठी सहकार म्हणजे केवळ संस्था काढणे नव्हते, तर तो गोरगरिबांचे जीवनमान उंचावण्याचा ‘राजमार्ग' होता. पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि सामाजिक उपयोगिता ही तत्त्वे त्यांनी सहकारात रुजविली.
दादांची तत्त्वनिष्ठा इतकी कठोर होती की, १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा मी (बाळासाहेब थोरात) जनतेच्या आग्रहास्तव अपक्ष म्हणून उभे राहिलो, तेव्हा कॉग्रेस विचारांशी बांधील असलेल्या दादांनी स्वतःच्या मुलाचा प्रचार करणे टाळले. त्यांनी कधीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. हीच शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा त्यांच्या कार्यकर्त्यासाठी आणि कुटुंबासाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरला.
संगमनेर तालुका आणि तळेगाव भागाचा कायापालट व्हावा, हे दादांचे स्वप्न होते. निळवंडे धरण पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. “आधी पुनर्वसन आणि मग धरण” हा मानवतेचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी स्वतःच्या कुटुंबाची ५ एकर जमीन धरणग्रस्तांसाठी दिली. आज जेव्हा निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला मिळते, तेव्हा त्यात दादांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसते.
दादा हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक ‘विज्ञानवादी वारकरी’ होते. त्यांना आळस आणि अंधश्रद्धेचा मनापासून राग होता. साहित्य आणि संस्कृतीवर त्यांचे अपार प्रेम होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यापासून ते नामदेव ढसाळ आणि नारायण सुर्वे यांच्यापर्यंत सर्वच दिग्गजांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या स्मरणशक्तीचा आवाका इतका मोठा होता की, हजारो कार्यकर्त्याना ते नावानिशी ओळखत असत.
वयाच्या ८४ व्या वर्षी, जेव्हा लोक विश्रांती घेतात, तेव्हा दादांनी ‘दंडकारण्य अभियान’ सुरू केले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सुरू झालेली ही चळवळ आज एक मोठी लोकचळवळ बनली आहे. दरवर्षी कोट्यवधी बियांचे रोपण आणि वृक्षसंवर्धनाची ही संस्कृती आज आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजली जात आहे.
१४ मार्च २०१० रोजी दादांचे निधन झाले आणि एका पर्वाचा अंत झाला. मात्र, त्यांनी दिलेला पारदर्शक कारभाराचा मंत्र आणि विकासाचे मॉडेल आजही मार्गदर्शक ठरत आहे. महसूल विभागातील कामांची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झालेली नोंद असो किंवा सहकार क्षेत्रातील आदर्शवत संस्थांचे जाळे, या सर्वाच्या मुळाशी दादांचे विचार आहेत.
तीर्थरूप दादा हे केवळ माझे वडील नव्हते, तर ते या तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार आणि माझ्या जीवनातील दीपस्तंभ आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा भावना स्व. भाऊसाहेब थोरात (दादा) यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.