‘नमो उद्याना’साठी महायुती सरकारचाचं १ कोटींचा निधी! - साक्षी सुर्यवंशी
◻️ महायुतीच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
संगमनेर LIVE | राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’अंतर्गत संगमनेर नगरपालिकेला ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी १ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या निधीवरून आता संगमनेरच्या राजकारणात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
संगमनेर नगरपरिषदेतील शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी सत्ताधारी नगराध्यक्षांवर जोरदार निशाना साधला आहे. १७ सप्टेंबर २०२५ रोजी नगरविकास विभागाने हा निधी मंजूर केल्याचे वास्तव समोर आले असून, नगराध्यक्षांनी आता जाहिरातबाजी थांबवून प्रत्यक्ष काम करून दाखवावे, असे आव्हान सूर्यवंशी यांनी दिले आहे. हा सर्व निधी आमदार अमोल खताळ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे मिळाला असल्याचेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगरपालिकेत सत्ता येताच झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. “जणू काही स्वतःच्या घरचा पैसा खर्च करून हे उद्यान उभे राहत आहे, अशा प्रकारचा आव नगराध्यक्षांकडून आणला जात आहे. मात्र, वास्तव हे आहे की महायुती सरकारच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच हा निधी संगमनेरला प्राप्त झाला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“संगमनेर २.० ची स्वप्ने दाखवणारे लोक आता आमदार खताळ यांनी आणलेल्या कामांवर आणि निधीवरच आपले ‘२.०’ सुरू असल्याचे सांगत आहेत," अशी खोचक टीका सूर्यवंशी यांनी केली. महायुती सरकारकडे पैसे नाहीत किंवा तिजोरीत खडखडाट आहे, असा खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांनी आता वास्तव स्वीकारले पाहिजे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
“नमो उद्यान असो किंवा कामगारांसाठीचा ‘सेवा दवाखाना’, प्रत्येक कामाचे श्रेय चोरण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. आमदार खताळ यांनी केलेल्या कामांचे आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचे सर्व कागदोपत्री पुरावे आम्ही कुठेही आणि कधीही सादर करायला तयार आहोत. इथून पुढे पदवीधर आमदारांची खोटी स्टंटबाजी संगमनेरमध्ये खपवून घेतली जाणार नाही.” असा इशारा देखील सौ. साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी दिला आहे.