ग्रामीण भागातील रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार मिळणार - डॉ. राजेंद्र विखे पाटील
◻️ लोणीच्या प्रवरा रुग्णालयात शस्त्रक्रिया आणि अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध
संगमनेर LIVE (लोणी) | ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत एक क्रांतिकारी पाऊल पडले असून, हृदयशस्त्रक्रिया, सांधेरोपण, मूत्रपिंड, यकृत, कॅन्सर आणि मेंदूविकारांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आता ग्रामीण जनतेला मुंबई - पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांसह ‘सुपर स्पेशालिटी ऑपरेशन थिएटर’ कार्यान्वित करण्यात आले आहे. ही सुविधा ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी केले.
प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते ‘सुपर स्पेशालिटी ऑपरेशन थिएटर’ या नूतन कक्षाचे लोणी येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विश्वस्त ध्रुव विखे पाटील, कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, रुग्णालय प्रशासनाचे संचालक मेजर जनरल (सेवानिवृत्त) डॉ. योगिंदर सिंग, वैदियकिय अधिक्षक डॉ. सुरेश जगदाळे, भूलशास्र विभागप्रमुख डॉ. अक्षय शेट्टी यांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, या अत्याधुनिक केंद्रामध्ये एकूण तीन ‘स्टेट-ऑफ-द-आर्ट’ ऑपरेशन थिएटरची उभारणी करण्यात आली असून, येथे मूत्रपिंड, हृदय आणि यकृत प्रत्यारोपणासह सांधे बदल गुडघे आणि हिप जॉईट शस्त्रक्रियांसारख्या जटिल उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुभवी आणि जागतिक दर्जाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची चमू या ठिकाणी सेवेसाठी सज्ज असून, रुग्णांना दर्जेदार मार्गदर्शन मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या महागड्या शस्त्रक्रिया सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्यासाठी रुग्णालयाने शासकिय योजनांची प्रभावी सांगड घातली आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, तर योजनेस पात्र नसलेल्या गरजू रुग्णांवर अत्यल्प दरात शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
“ग्रामीण जनतेला जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा त्यांच्या दारात उपलब्ध करून देणे हीच आमची प्राथमिकता आहे. या उपक्रमातून ‘रुग्णसेवा हाच धर्म' हे प्रवरा परिवाराचे ब्रीद पुन्हा एकदा अधोरेखित झाले, असे देखील डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले आहे.
दरम्यान या सुविधेमुळे केवळ अहिल्यानगर जिल्हाच नव्हे, तर नाशिक, संभाजीनगर, बीड आणि पुणे जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला एक नवी दिशा मिळाली आहे.