संगमनेरची मानाची होलमराजा काठी जेजुरीकडे मार्गस्थ!

संगमनेर Live
0
संगमनेरची मानाची होलमराजा काठी जेजुरीकडे मार्गस्थ!

◻️ ​आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते भक्तिभावाने महाआरती


​संगमनेर LIVE | “मल्हार मार्तड की जय, खंडोबा महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार!” अशा गगनभेदी जयघोषात आणि भंडाऱ्याच्या सोनेरी उधळणीत संगमनेरची मानाची ‘होलमराजा काठी’ मंगळवारी (दि. २७) जेजुरीच्या दिशेने रवाना झाली. 

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा देवस्थानचा माघ पौर्णिमा यात्रोत्सव यंदा १ व २ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होत असून, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर संगमनेरची ही परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते खंडोबा देवाची महाआरती करण्यात आली.

मंगळवारी ​सकाळी १० वाजता शहरातील तेली खुंट येथील होलमराजा मंदिरात खंडोबा भक्तांच्या हस्ते महाआरती करून ही काठी मिरवणुकीने निघाली. ही भक्तीमय मिरवणूक सय्यद बाबा चौक आणि मेन रोड मार्गे मार्गस्थ होत असताना माळीवाडा येथील मारुती मंदिर तसेच साळीवाडा येथील खंडोबा मंदिरात महाआरतीसाठी थांबली होती. 

त्यानंतर ही काठी खंडोबा गल्लीतील मल्हार मार्तडाचे निस्सीम भक्त मदन पारख यांच्या निवासस्थानी काही काळ विसावली. याठिकाणी आमदार अमोल खताळ यांनी अतिशय भक्तीभावाने मल्हार मार्तड खंडोबा देवाची महाआरती केली. महाआरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

​या सोहळ्यासाठी संगमनेर येथील मल्हार मार्तड खंडोबा होलम राजा देवस्थान, मल्हार मार्तड होलम भक्त सार्वजनिक काटकर मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने खंडोबा भक्त सहभागी झाले होते. 

यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करत ही मानाची काठी भक्तीमय वातावरणात जेजुरीकडे रवाना झाली. संपूर्ण शहरात या निमित्ताने आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !