संविधानातील मूल्यांचे जतन हीच खरी देशसेवा - खासदार भाऊसाहेब वाकचौरे
◻️ चिंचोली गुरव येथे झेंडावंदन आणि देशभक्तीचा जागर
◻️ शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीतून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | “भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय यांसारखी अनमोल मानवी मूल्ये दिली आहेत. या मूल्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही केवळ सरकारची नाही, तर आपल्या सर्वाची नैतिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जोपासत देशाची लोकशाही अधिक सक्षम आणि बळकट करावी,” असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित झेंडावंदन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार वाकचौरे बोलत होते.
विद्यार्थी आणि उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी सुजाण नागरिक घडणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासूनच मुलांनी शिस्त आणि राष्ट्रप्रेमाचे धडे गिरवले पाहिजेत. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सुशिक्षित आणि संवेदनशील समाजाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी खासदार वाकचौरे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी आपली सदिच्छा व्यक्त केली.
दरम्यान या ध्वजवंदन सोहळ्यासाठी शाळेचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ च्या घोषणांनी याप्रसंगी आसमंत दुमदुमून गेला होता.