शिर्डीच्या श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलची विज्ञान प्रदर्शनात गरुडझेप
◻️ नामदार विखे पाटलांकडून राज्यस्तरावर निवड झालेल्या साई सिनगरचा सत्कार
संगमनेर LIVE (शिर्डी) | श्री साईबाबा संस्थान संचलित, श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलच्या (प्राथमिक विभाग) शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. अहमदनगर जिल्हा परिषद, पंचायत समिती अकोले व विज्ञान-गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड येथील श्री नागेश विद्यालय येथे ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान-गणित व पर्यावरण प्रदर्शन (सन २०२५–२६) नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनात संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून सुमारे २३४ विविध नाविन्यपूर्ण उपकरणे सहभागी झाली होती, ज्यात शिर्डीच्या विद्यार्थ्याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली.
या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राथमिक विभागातील इयत्ता सहावीचा विद्यार्थी चि. साई विलास सिनगर याने 'ग्रीन एनर्जी' (हरित ऊर्जा) या विषयावर आधारित अत्यंत प्रभावी आणि अभ्यासपूर्ण प्रकल्प सादर केला. पर्यायी ऊर्जा स्रोतांचा प्रभावी वापर मांडणाऱ्या या उपकरणाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.
या घवघवीत यशामुळे साईची आता नागपूर येथे आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्याला शाळेचे विज्ञान शिक्षक अमोल निर्मळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनाचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा राज्याचे महसूल व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
चि. साई सिनगर याने मिळवलेल्या या यशाबद्दल जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे - सोनटक्के, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.
तसेच प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ, सौ. शिल्पा पुजारी, मुख्याध्यापिका, प्राचार्य आसिफ तांबोळी आणि गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे यांनीही साईचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून त्याला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.