“..तस्कर कोणत्याही पक्षाचा असो, गय करणार नाही” - आमदार अमोल खताळ
◻️ महसूल आणि पोलिसांची कारवाई करण्याचे निर्देश
संगमनेर LIVE | संगमनेर विधानसभा मतदारसंघात शासनाच्या घरकुल योजनेचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून अशा प्रकारे गौण खनिजांची चोरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. “..तस्कर कोणत्याही पक्षाचा असो, त्याची गय करू नका, थेट गुन्हे दाखल करा," असे म्हटल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
शासनाच्या धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. मात्र, संगमनेरमध्ये काही वाळू तस्कर या योजनेचा आडोसा घेऊन प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करत असल्याचे समोर आले आहे. गरीबांच्या हक्काच्या वाळूवर डल्ला मारणाऱ्या या प्रवृत्तींविरोधात आता आमदार खताळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील महसूल, पोलीस आणि परिवहन विभागाला स्पष्ट आदेश दिले आहेत. शासनाची फसवणूक करणाऱ्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करणाऱ्या तस्करांशी कोणतीही तडजोड न करता त्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
आमदार खताळ आणि पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर संगमनेर महसूल विभागाने आता मोठी मोहीम हाती घेतली असून कारवाईचा वेग वाढवला आहे. प्रशासनाने प्रवरा नदीपात्राकडे वाळू वाहतुकीसाठी जाणारे सर्व अनधिकृत रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खोदून पूर्णपणे बंद केले आहेत. यासोबतच अनधिकृतपणे वाळू उपसा करणारी वाहने आणि त्या ठिकाणी असलेले साहित्य जप्त करण्याचे सत्र रात्रं-दिवस सुरू आहे. या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या अनेक जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले असून, प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
“अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो, तिची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. खऱ्या अर्थाने गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळाली पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. मात्र, त्यांच्या नावाखाली कोणी आपली पोळी भाजून घेत असेल, तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश मी दिले आहेत.” असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.