५० हजाराच्या लाल वादळ आदोलकांकडून ‘चारोटी ते पालघर’ मोर्चाला सुरुवात!
◻️ मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी पालघरमध्ये धरणे आंदोलनाचा निर्धार
संगमनेर LIVE (पालघर) | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा चारोटी ते पालघर ५० हजार लोकांच्या अतिभव्य मोर्चाची सुरुवात! नमस्कार संगमनेर लाईव्ह मध्ये आपले स्वागत, आता बातमी सविस्तर पाहू. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या सुमारे ५० हजार लोकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढला.
हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, रात्री मनोर येथे मुक्काम करेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. जोपर्यंत सरकारच्या वतीने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात आपल्या ज्वलंत आणि प्रलंबित मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत हा प्रचंड जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करणार आहे.
अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांसारख्या संघटनाही मोठ्या संख्येने सामील झाल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व माकपचे डॉ. अशोक ढवळे, मरियम ढवळे, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले, किरण गहला आणि इतर अनेक जण करत आहेत. उद्या सीपीएमचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हे देखील या मोर्चात सामील होणार आहे.
दरम्यान वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, सर्व देवस्थान, इनाम, वरकस आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करणे, मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे, स्मार्ट मीटर योजना रद्द करणे, पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे, चार श्रम संहिता रद्द करणे, वाढवण आणि मुरबे बंदरांचे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करणे, शिक्षण, रोजगार, रेशन, आरोग्य इत्यादी सुविधांमध्ये वाढ करणे. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.