“आप्पांच्या निःस्वार्थ सेवेचा वारसा नव्या पिढीने पुढे न्यावा” - ज्येष्ठ नेते प्रसादराव तनपुरे

संगमनेर Live
0
“आप्पांच्या निःस्वार्थ सेवेचा वारसा नव्या पिढीने पुढे न्यावा” - ज्येष्ठ नेते प्रसादराव तनपुरे

◻️ सात्रळ येथे कडू पाटील स्मृतीदिन सोहळ्यात ‘ऋषितुल्य’ व्यक्तींचा सन्मान!


संगमनेर LIVE (​सात्रळ) | “पी. बी. कडू पाटील तथा आप्पा हे एक सुसंस्कृत आणि आदर्श समाजकारणी होते. त्यांनी आयुष्यभर निष्काम कर्म करत वैचारिक मूल्यांची जपवणूक केली. विरोधकांचा सन्मान करण्याची त्यांची वृत्ती आणि त्यांनी तयार केलेली निष्ठावंत कार्यकर्त्याची फळी आजही मार्गदर्शक आहे. आप्पांच्या या उदात्त विचारांचे पाईक होताना, तरुण पिढीने त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा वारसा पुढे न्यावा” असे आवाहन माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रसादराव तनपुरे यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी मातोश्री शांताबाई कडू पाटील यांच्या सामाजिक योगदानाचाही विशेष गौरव केला.

​राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कॉ. पी. बी. कडू पाटील आणि मातोश्री शांताबाई कडू पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित सन्मान आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक मधुकर नवले होते. व्यासपीठावर अर्जुनराव राजळे, ॲड. विजयराव कडू, पंकज कडू, योगेश चोरमुंगे, अनिल लोढा, सौ. शोभाताई कडू, सौ. सुरेखा कडू, सौ. निकिता कडू, प्राचार्य सीताराम गारुडकर, मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, पर्यवेक्षिका हेमलता साबळे आणि विभागप्रमुख विलास दिघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात मधुकर नवले यांनी आप्पांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, अकोले तालुक्यात त्यांची प्रतिमा एक जननायक म्हणून होती. सहकार क्षेत्रात काम करताना ‘देण्यासाठी यायचे’ ही त्यांची भूमिका आजही अनेकांसाठी आदर्श आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते कष्टकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यापर्यत त्यांनी दिलेला लढा प्रेरणादायी असून स्वावलंबन आणि स्वाभिमान जपला तरच देश खऱ्या अर्थाने विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​कार्यक्रमाच्या वैचारिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकताना अरुण कडू यांनी नमूद केले की, कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पक्षाच्या निष्ठावंत सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीत कम्युनिस्ट विचारसरणीचा वाटा विशद केला. तत्पूर्वी, किरण कडू पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात कॉ. पी. बी. कडू पाटील आणि मातोश्री शांताबाई कडू पाटील यांच्या कार्याचा गौरव केला आणि कडू पाटील फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान..

कॉ. गंगाधर पाटील जाधव, कॉ. कारभारी उगले, कॉ. भगवान गागरे, कॉ. एल. एम. डांगे, नामदेवराव दिघे, बबनराव कडू, सखाराम अंत्रे, मारुती अनाप, प्रभाकर पलघडमल, कॉ. बाबा आरगडे, कॉ. लक्ष्मणराव नवले, कॉ. पांडुरंग शिंदे, डी. एस. वडजे, शांतीभाऊ गांधी, संभाजीराव चोरमुंगे, कुशीनाथ गोपाळा अंत्रे, अहमद हसन शेख, कॉ. कृष्णा पवार, कॉ. नारायण गायकवाड, कॉ. बादशाह भाई, गुलाबराव आहेर गुरुजी, डॉ. के. के. बोरा, भाऊसाहेब कडू, माधवराव शिरसाठ, नारायणराव मुसमाडे, श्रीमती सुमनताई अशोकराव ताकटे, श्रीमती भागीरथीबाई बाबुराव थोरात या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वासह उद्योजक अशोकराव खटके, माजी प्राचार्य गहिनीनाथ विखे, ॲड. राधाकिसन पुलाटे, शिवाजीराव भोर, माजी सचिव भाऊसाहेब पेटकर तसेच निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.

दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामदास तांबे आणि सचिन पलघडमल यांनी केले, तर माजी प्राचार्य गहिनीनाथ विखे यांनी आभार मानले. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !