डॉ. सुजय विखे पाटील ‘वाहतूक नियोजनासाठी’ रात्री उशीरा रस्त्यावर!

संगमनेर Live
0
डॉ. सुजय विखे पाटील ‘वाहतूक नियोजनासाठी’ रात्री उशीरा रस्त्यावर!

◻️ सलग दुसऱ्यांदा महामार्गाच्या कामाचा आणि वाहतूक व्यवस्थेचा घेतला आढावा.


संगमनेर LIVE (​राहुरी) | नगर - मनमाड महामार्गावर राहुरी शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. या गंभीर परिस्थितीमुळे प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात होते. या समस्येची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराला तातडीने उपाययोजना करण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. त्यांच्या या हस्तक्षेपानंतर सोमवारी शहरातील वाहतूक व्यवस्था काही प्रमाणात सुरळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

​याच पार्श्वभूमीवर, सोमवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. विखे पाटील यांनी राहुरीत दुसऱ्यांदा प्रत्यक्ष भेट देऊन नगर - मनमाड मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. त्यांनी स्वतः रस्त्यावर थांबून नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या तांत्रिक आणि नियोजनात्मक सूचना दिल्या.

​यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. विखे पाटील यांनी अत्यंत संवेदनशील भूमिका मांडली. मागील काही दिवसांपासून राहुरीकरांना जो प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, त्याबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली. “जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. केवळ फोटो आणि व्हिडिओ काढण्यापुरते काम न करता, लोकांचे प्रश्न प्रत्यक्ष सुटले पाहिजेत हीच माझी ठाम भूमिका आहे,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

​या पाहणी दौऱ्यावेळी डॉ. विखे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या शिस्तीचे आणि कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “मला निष्ठावान आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्याची साथ लाभली आहे, हे माझे भाग्य आहे. आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून केवळ आंदोलन करत नाहीत, तर नेत्याने दिलेल्या आदेशांचे पालन करत प्रत्यक्ष मदतीसाठी धावून जातात.” वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करत त्यांनी ग्वाही दिली की, यापुढे जिथे कुठे ट्रॅफिक जॅमची परिस्थिती उद्भवेल, तिथे कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करतील. असे नमूद केले.

​या प्रसंगी देवळाली प्रवरा येथील नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असून नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान डॉ. विखे पाटील यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे महामार्गावरील कामाला शिस्त लागली असून, भविष्यात नागरिकांना असा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी यंत्रणांना सतर्क केल्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !