रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द मार्ग आता प्रकाशमान होणार!

संगमनेर Live
0
रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द मार्ग आता प्रकाशमान होणार!

◻️ आमदार खताळांच्या पाठपुराव्यामुळे ​१०८ पथदिवे आणि ४ हायमॅक्स दिव्यांचे काम अंतिम टप्प्यात


​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द दरम्यानच्या जुन्या नाशिक - पुणे महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून असलेला अंधाराचे साम्राज्य आता संपुष्टात येणार आहे. आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मार्गावर १०८ नवीन पथदिवे आणि ४ हायमॅक्स दिवे बसवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हा मार्ग प्रकाशाने न्हाऊन निघणार आहे.

​पुणे - नाशिक रस्त्याचे दुहेरीकरण झाल्यानंतरही या मार्गावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोकादायक बनले होते. अवजड वाहने, वेगाने जाणारी वाहतूक आणि पादचाऱ्यांचा राबता यामुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. 

ही गंभीर समस्या लक्षात घेऊन संगमनेर खुर्द येथील शिवसेना महायुतीचे निलेश गुंजाळ, सचिन पावबाके, संकेत खुळे, महेश सातपुते, ॲड. भाऊसाहेब गुंजाळ, संतोष शिंदे, जग्गू शिंदे, विकास कोल्हे, ओंकार गुरुकुले, अमोल गुंजाळ, ईश्वर मांडेकर, सोनल गुंजाळ, अभिषेक गुंजाळ, योगेश नवले, दत्ता खुळे, महेश मांडेकर या कार्यकर्त्यानी आमदार अमोल खताळ यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती.

​नागरिकांची ही मागणी आणि रस्ता सुरक्षिततेचे गांभीर्य लक्षात घेता आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित ठेकेदाराकडे प्रत्यक्ष भेटी देऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध झाला असून संपूर्ण मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाचे १०८ नवीन पथदिवे उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे चौक आणि धोकादायक वळणांवर ४ उच्च क्षमतेचे हायमॅक्स दिवे बसवण्यात आले आहेत. या सुविधेमुळे रात्रीचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पूर्णपणे अपघातमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे.

​याबाबत माहिती देताना शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे म्हणाले, “सध्या या पथदिव्यांच्या वायरिंगचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत हे दिवे पूर्ण क्षमतेने सुरू होतील. यामुळे केवळ वाहनचालकांनाच नाही, तर स्थानिक व्यापारी आणि शेतकरी बांधवांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार खताळ यांनी दाखवलेल्या या कार्यतत्परतेमुळे नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.” या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !