सण - उत्सव हे भारतीय संस्कृतीचे अलंकार - महंत उध्दव महाराज मंडलिक

संगमनेर Live
0
सण - उत्सव हे भारतीय संस्कृतीचे अलंकार - महंत उध्दव महाराज मंडलिक

◻️ ​सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमात वद्य एकादशीनिमित्त कीर्तन महोत्सव संपन्न


​ संगमनेर LIVE (नेवासे) | “भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात जुनी आणि श्रेष्ठ संस्कृती आहे. आपले सण आणि उत्सव हे या संस्कृतीचे खरे अलंकार आहेत. या माध्यमांतून समाजातील सर्व स्तरांतील लोक एकत्र येतात, विचारांची देवाण-घेवाण होते आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने संस्कृतीचे जतन होते,” असे प्रतिपादन महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांनी केले.

सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम, नेवासा बुद्रुक (सूरेगांव रोड) येथे वद्य एकादशीनिमित्त आयोजित एकदिवसीय कीर्तन महोत्सवात महंत उध्दव महाराज मंडलिक बोलत होते.

​महंत उध्दव महाराज यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 'देव तिळी आला l गोडे गोड जीव धाला ll' या अभंगावर सुंदर निरूपण केले. ते म्हणाले की, संतांनी काळानुरूप आणि तीर्थानुरूप अभंगांची रचना करून समाजाला भक्तीची प्रेरणा दिली आहे. भगवंत आपल्याकडून परमार्थिक कार्य करून घेत असतो, आपण केवळ निमित्त असतो. मात्र, या परमार्थात भक्तीला प्रेमाची जोड असणे अनिवार्य आहे. 

मकर संक्रांतीच्या सणाचे महत्त्व विशद करताना महाराज म्हणाले की, हा सण आता केवळ भारतापुरता मर्यादित नसून जागतिक स्तरावर साजरा होत आहे. आजच्या तरुण पिढीला भारतीय संस्कृतीची शिकवण देणे काळाची गरज आहे, कारण संस्कृती टिकली तरच संस्कार टिकतात आणि संस्कारांमुळेच कुटुंब व्यवस्था भक्कम राहते.
​माणसाचे जीवन हे केवळ कष्ट करण्यासाठी नसून ते पुण्य कर्म करण्यासाठी आहे, असे स्पष्ट करत महाराजांनी नमूद केले की, खरी शांती ही भोगातून नव्हे तर त्यागातून मिळते. जोपर्यत माणसातील विवेक जागृत होत नाही, तोपर्यत त्याच्या हातून सत्कर्म घडत नाही. जीवनात संगतीला फार महत्त्व असून चांगल्या माणसांच्या सहवासात प्रगती होते, तर वाईट संगतीमुळे हानी सोसावी लागते. 

ग्रंथ हे आपल्या आई - वडिलांसारखे मार्गदर्शक असून ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात. जेव्हा आपल्या वृत्तीतील दोष कमी होऊ लागतात, तेव्हाच आपली परमार्थिक वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे असे समजावे. मोठी उद्दिष्टे बाळगणाऱ्यांनी किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून सत्कर्मावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण कोणतेही पुण्य कर्म न करता मरण येणे हे देखील एक पापच आहे. असे देखील म्हणाले आहेत.

​कीर्तनानंतर आश्रमात विविध प्रकारची सेवा देणाऱ्या दात्यांचा महंत उध्दव महाराज यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमाचे शिक्षक बाळासाहेब झिने यांनी केले. याप्रसंगी स्व. गीताई आणि स्व. नारायण मुक्ताजी राजळे यांच्या स्मरणार्थ वसंतराव नारायण राजळे यांच्या वतीने भाविकांसाठी फराळ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

दरम्यान या महोत्सवाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !