बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांना पाठीशी घालू नका
◻️मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे प्रशासनाला कडक आदेश!
◻️ लोणी येथील जनता दरबारात नागरीकांच्या समस्याचा निपटारा
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, कार्यकर्ता कोणाचाही असो कायदेशीर कारवाई करण्यात महसूल आणि पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरूवारी जनता दरबाराच्या माध्यामातून राज्यातून तसेच जिल्ह्यातून आलेल्या नागरीकांची निवेदन स्विकारून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक निवेदनांच्या बाबतीत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना करून, प्रश्न निकाली काढण्याचे तसेच सामाजिक आणि व्यक्तिगत स्वरुपात प्राप्त झालेल्या निवेदनावर निर्धारीत वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपश्याबाबत मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल मंत्री विखे पाटील यांनी घेतली. महसूल आणि पोलीस प्रशासनाची एकत्रित बैठक घेवून त्यांना सर्व ठिकाणचा वाळू उपसा तातडीने थांबविण्याच्या सूचना केल्या. शासकीय योजना तसेच घरकुलासाठी वाळू उपलब्ध करून देताना सर्व कागदपत्र पडताळून मगच निर्णय करण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
नदीपात्रातून दिवसा आणि रात्री सुध्दा वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा न दाखवता कडक धोरण घेण्याचे स्पष्ट करून कोणालाही पाठीशी न घालण्याच्या सूचना त्यांनी महसूल आणि पोलीस प्रशानातील वरीष्ठांना दिल्या. ज्या भागातून वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असेल त्याची जबाबदारी संबंधित गावातील तलाठी, मंडल आधिकारी यांच्यावर निश्चित करून वेळप्रसंगी त्यांच्यावरही कारवाई करावी.
प्रशासनाच्या नावाखाली काही व्यक्ति आशा बेकायदेशीर कृत्याला सहकार्य करणारे कोणी असतील तर त्यांनाही सोडू नका असे आदेशच मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी येथील प्रांताधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसिलादार यांच्यासह मंडल आधिकारी उपस्थित होते.
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी संवेनशीलतेने कार्यवाही करावी. अचारसंहीता शिथील झाल्यानंतर योजनांच्या कार्यवाहीला तसेच विकासात्मक कामांना प्राधान्य देण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.