आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहोचवा - पालकमंत्री विखे पाटील
◻️ राहाता तालुक्यातील ११ शेतकऱ्यांना ‘कम्बाईन हार्वेस्ट’'चे वितरण
◻️ २२५ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, तर ७१४ जणांना मिळालं कोट्यवधींचं अनुदान
संगमनेर LIVE (लोणी) | केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत असून, योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून कृषी विभागाने योजनांची जागृती बांधावर जावून करावी. असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता तालुक्यातील पिंपळवाडी, रामपूरवाडी, आडगाव, नांदूर, शिर्डी, पुणतांबा आशा गावांमधील अकरा शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून कम्बाईन हार्वेस्टर या घटकासाठी निवड झाली. मंजूर झालेल्या हार्वेस्टरचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कृषी यांत्रिकीकरण योजने करीता तालुक्यातील १३ हजार २४१ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. आतापर्यत २२५ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा लाभ घेतला असून, यासाठी २ कोटी ७२ लाख रुपयांचे अनुदान मंजुर झाले असून, ट्रॅक्टरचलित औजरांसाठी ७१४ शेतकऱ्यांची निवड झाली असून यासाठी ६ कोटी ६७ लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याचे विखे पाटील म्हणाले.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विकासाला गती देताना नविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून योजनांची अंमलबजावणी होत आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघात अनेक शेतकरी प्रयोगशील शेतीच्या माध्यामातून करीत असलेल्या प्रगतीला शासन योजनांचे पाठबळ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने योजनांची जागृती गावा बरोबरच शेतकऱ्यांच्या बांधापर्यत करण्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, मंडल अधिकारी रमेश चोपडे, अभय बोरसे, सचिन गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.