संगमनेर नगरपरिषदेत शास्ती माफीसाठी अभय योजना लागू

संगमनेर Live
0
संगमनेर नगरपरिषदेत शास्ती माफीसाठी अभय योजना लागू

◽आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

◽संगमनेर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 


संगमनेर LIVE | राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात अनेक वर्षापासून थकीत मालमत्ता करामुळे सामान्य नागरिकांवर शास्तीचा मोठा बोजा पडत होता. ही समस्या लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आणि अखेर राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत शास्ती माफ करण्यासाठी ‘अभय योजना’ लागू केली. या निर्णयानुसार संगमनेर नगरपरिषद हद्दीतील २०,४१६ मालमत्तांवरील ५० टक्के शास्ती (दंड) म्हणजेच जवळपास २ कोटी ४ लाख ९४ हजार ०७९ रुपये माफ केले जाणार असून या योजनेचा लाभ नगरपरिषद हद्दीतील थकबाकीदार नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन आमदार खताळ यांनी केले. 

संगमनेरमधील ८,४८० थकबाकीदार नागरिकांना अभय योजनेचा लाभ मिळणार! 

आमदार खताळ यांनी यासाठी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला, तसेच नागरीकांच्या व नगरपरिषदांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने सादर केली होती. या पाठपुराव्याची दखल घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘अभय योजना’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता संगमनेर नगरपरिषद हद्दीतील थकबाकीदार असलेल्या ८,४८० नागरिकांना याचा थेट फायदा मिळणार आहे.

दरम्यान 'अभय योजना’ अंमलबजावणीसाठी नगरपरिषद प्रशासनाला अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे ३१ मार्च २०२५ अखेरची थकबाकी रक्कम Integrated Web Based Portal (IWBP) वर उपलब्ध नसल्यामुळे संगमनेर नगरपरिषदेपुढे शास्ती माफीचा लाभ नागरिकांना देणे अवघड बनले होते. यासंदर्भात आमदार खताळ यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून नगरपरिषद प्रशासनासमोरील अडचणी, पोर्टलवर थकबाकीची अपूर्ण नोंद आणि नागरिकांना वेळेत दिलासा न मिळाल्यास निर्माण झालेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती मांडली होती. त्यानुसार शास्तीकर माफीतील तांत्रिक अडचणी दूर करून ठोस निर्णय घेण्यात आला. 

वर्षानुवर्ष थकित कर आणि त्यावरील वाढता दंड यामुळे नागरिकांवर प्रचंड आर्थिक भार पडत होता. आता अभय योजनेमुळे संगमनेर नगरपरिषद क्षेत्रातील करदात्यांसह राज्यातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महायुती सरकाराच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

“संगमनेर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षापासून अन्यायकारकपणे शास्ती दंड आकारला जात होता. या वसुलीमुळे नागरिकांवर प्रचंड आर्थिक भार पडत होता. ही बाब लक्षात घेता केलेल्या पाठपुराव्यामुळे नागरिकांना दिलासा देणारा मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला. नागरिकांनी या संधीचा आणि अभय योजनेचा अवश्य लाभ घ्यावा." असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !