संगमनेर येथे अत्याधुनिक जेटिंग मशीनने होणार ड्रेनेजची सफाई!
◻️ नगरपरिषदेच्या ५५ लाखांच्या अत्याधुनिक यंत्राचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लोकार्पण
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपरिषदेने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेने ५५ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक जेटिंग मशीन खरेदी केले असून, त्याचे लोकार्पण नुकतेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या अभिनव प्रकल्पामुळे संगमनेर नगरपरिषद आपल्या जनहितार्थ कामांमुळे राज्यात आदर्शवत ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या सोहळ्यात या ५५ लाख रुपये किमतीच्या यंत्राचे विशेष कौतुक करण्यात आले. या अत्याधुनिक मशीनची कार्यक्षमता अत्यंत उच्च दर्जाची असून, यामध्ये ५ हजार लिटरची जेटिंग क्षमता आणि ३ हजार लिटर गाळ व कचरा शोषून घेण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे.
या तंत्रज्ञानामुळे शहरातील भूमिगत गटारी व ड्रेनेजची स्वच्छता अत्यंत वेगवान, सुरक्षित आणि परिणामकारक पद्धतीने होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मशीनमुळे आता मॅनहोलमध्ये मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टळणार असून, कामगारांना स्वतः ड्रेनेजमध्ये उतरण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे अपघातांचा धोका कायमचा संपुष्टात येईल.
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, १९९१ पासून संगमनेर नगरपालिकेने नागरिकांना सातत्याने अत्याधुनिक आणि सर्वोत्तम नागरी सुविधा पुरवल्या आहेत. संगमनेरची शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव ही आपली महत्त्वाची परंपरा असून ती सर्वांनी जपावी. स्वच्छता आणि नीटनेटकेपणाच्या बाबतीत शहराचा देशात लौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांनी अधिक जोमाने काम करून शहराची राजकीय संस्कृती अधिक बळकट करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान हा प्रकल्प राज्यामध्ये एक अभिनव उपक्रम म्हणून ओळखला जात असून, या माध्यमातून संगमनेर शहराच्या स्वच्छतेच्या प्रवासात एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे.