सात्रळच्या कन्या विद्यालयाची ‘कले’च्या क्षेत्रात उत्तुंग भरारी!

संगमनेर Live
0
सात्रळच्या कन्या विद्यालयाची ‘कले’च्या क्षेत्रात उत्तुंग भरारी!

◻️ ​शासकीय रेखा कला ग्रेड परीक्षेत विद्यालयाचा शंभर टक्के निकाल


संगमनेर LIVE (​सात्रळ, समर्थ वाकचौरे) | नोव्हेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखा कला ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट अशा दोन्ही परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थिनींनी यशाची परंपरा कायम राखली आहे.

​एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत विद्यालयातील एकूण ७१ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी विशेष प्राविण्य मिळवत यश संपादन केले असून, यामध्ये ७ विद्यार्थिनींनी ‘ए’ श्रेणी, ५४ विद्यार्थिनींनी ‘बी’ श्रेणी आणि १० विद्यार्थिनींनी ‘सी’ श्रेणी प्राप्त केली आहे.

यामध्ये प्रामुख्याने कु. आलिया मुनीर तांबोळी, कु. जोया इरफान शेख, कु. प्रणाली सिताराम गावडे, कु. रुक्मिणी संतोष प्रधान, कु. सायली राजेंद्र दिघे, कु. श्रावणी योगेश दिघे आणि कु. वैष्णवी अजित गीते या विद्यार्थिनींनी ‘ए’ श्रेणी मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

​त्याचप्रमाणे, इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व ६६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून या परीक्षेचा निकालही १०० टक्के लागला आहे. यामध्ये ३ विद्यार्थिनींनी ‘ए’ श्रेणी, २० विद्यार्थिनींनी ‘बी’ श्रेणी आणि ४३ विद्यार्थिनींनी ‘सी’ श्रेणी पटकावली आहे.

इंटरमिजिएट परीक्षेत कु. जैनब तौकीर मन्सुरी, कु. समीक्षा अनिल पाटोळे आणि कु. श्रद्धा शरद आंधळे या विद्यार्थिनींनी ‘ए’ श्रेणीसह विशेष यश संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना विद्यालयाच्या कला शिक्षिका श्रीम. एस. जी. नवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या परिश्रमामुळेच विद्यार्थिनींना कलेचे हे उच्च शिखर गाठता आले.

दरम्यान ​या उज्वल यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. व्ही. एस. ब्राम्हणे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के पाटील, विभागीय अधिकारी बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडी आणि तोरणे यांनी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षिकांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच सात्रळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि पालकांनीही अभिनंदन करत विद्यार्थिनींच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !