जोर्वे शिवारात भीषण अपघातात भरधाव आयशर टेम्पो विहिरीचे कठडे तोडून घराला धडकला

संगमनेर Live
0
जोर्वे शिवारात भीषण अपघातात आयशर टेम्पो विहिरीचे कठडे तोडून घराला धडकला

 ◻️ ‘दैव बलवत्तर’ म्हणून मोठा अनर्थ टळला; अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर टेम्पो बाहेर काढण्यात यश 


संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील जोर्वे - रहीमपूर मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. कोंबडी खताने भरलेला एक भरधाव आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीचे कठडे तोडून घराला धडकला आहे. या भीषण अपघातात जीवितहानी टळल्याने 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीचा प्रत्यय आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सटाणा तालुक्यातील देवळाभोर येथील आयशर टेम्पो (क्रमांक एम.एच. ४१, ए.व्ही. ६१८३) हा कोंबडी खताच्या गोण्या घेऊन संगमनेर तालुक्यातील खांबा येथे आला होता. तेथे काही माल उतरवून हा टेम्पो आश्‍वी - रहीमपूर मार्गे संगमनेरच्या दिशेने जात असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास जोर्वे शिवारात हा अपघात घडला.

​जोर्वे शिवारातील लहानू बाळाजी जाधव यांच्या वस्तीनजीक असलेल्या एका धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित झालेला हा टेम्पो काळ बनून रस्त्याच्या कडेला धावला. विशेष म्हणजे, टेम्पोच्या मार्गातच महावितरणचा ट्रान्सफॉर्मर होता, मात्र तो थोडक्यात वाचला. टेम्पोने ट्रान्सफॉर्मरचे ताण आणि विहिरीचे सिमेंटचे कठडे तोडत थेट विहिरीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या जाधव यांच्या घराला जोराची धडक दिली. 

या धडकेमुळे घराच्या पायाला मोठी भेग गेली आहे. ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्हा जाधव दांपत्य घरामध्ये गाढ झोपेत होते, तर शेजारीच असलेल्या वीटभट्टीवर अनेक कामगार कुटुंबे वास्तव्यास होती. सुदैवाने, टेम्पो विहिरीत अडकल्यामुळे या सर्वाचा जीव थोडक्यात वाचला आणि एक मोठा अनर्थ टळला.
​या भीषण अपघातामुळे जीवितहानी टळली असली तरी जाधव यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. घराच्या भिंतीसह विहिरीचे कठडे, विहिरीतील विद्युत मोटार आणि पाईपलाईन चक्काचूर झाली आहे. टेम्पोमधील चालक आणि इतर प्रवासी अपघातातून बालंबाल बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. रविवारी दुपारी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत हा आशयर टेम्पो विहिरीतून बाहेर काढण्याची प्रक्रिया राबवण्यात आली, यावेळी हा थरार पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा आयशर टेम्पो बाहेर काढण्यात यश आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !