नगर - मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी डॉ. विखे पाटील ‘ऑन फील्ड’
◻️ रस्ते कामाचा वेग वाढवण्याच्या आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रशासनाला सूचना
◻️ वेळप्रसंगी होमगार्डचा पगार सुद्धा देण्याची दिली ग्वाही
संगमनेर LIVE (राहुरी) | नगर - मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी परिसरात निर्माण झालेली प्रचंड वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे होणारे हाल पाहून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर, वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी केवळ सूचनाच दिल्या नाहीत, तर “गरज भासल्यास होमगार्डचा पगार मी स्वतः देईन," असे ठाम आश्वासन देऊन आपली संवेदनशीलताही जपली.
गेल्या अनेक दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, कामाची संथ गती आणि अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे ही समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध संवेदनशील ठिकाणांना भेटी देऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेतला.
पाहणी दरम्यान त्यांना रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम, शास्त्रीय आधार नसलेले वळणमार्ग आणि अपुरे पोलीस बळ यामुळे ही कोंडी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. विशेषतः रात्रीच्या वेळी दिशादर्शक फलक आणि प्रकाशव्यवस्थेच्या अभावामुळे अपघातांचा धोकाही वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
वाहतूक कोंडीच्या या चक्रातून नागरिकांची सुटका करण्यासाठी डॉ. विखे पाटील यांनी पोलीस प्रशासन आणि संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, वाहतूक नियंत्रणासाठी जर प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता असेल, तर तेथे तातडीने होमगार्डची नियुक्ती करण्यात यावी. “प्रशासकीय प्रक्रियेमुळे निधीची अडचण येत असेल किंवा मानधन रखडणार असेल, तर त्या होमगार्डचा पगार मी स्वतःच्या खिशातून देईन, पण सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाचे कान टोचले.
या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्रशासनाला विशेष सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये वाहतूक कोंडी होणाऱ्या महत्त्वाच्या चौकांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करणे, रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर्स आणि बॅरिकेड्सची योग्य मांडणी करणे, तसेच वाहनांच्या सुलभ हालचालीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करणे या बाबींवर त्यांनी भर दिला आहे. कंत्राटदाराने कामाचा वेग वाढवून ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा कठोर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
शेवटी, डॉ. विखे पाटील यांनी राहुरीतील जनतेलाही संयम ठेवण्याचे आवाहन केले. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून कोणाचाही प्रवास धोकादायक ठरणार नाही, असे त्यांनी नमूद केले. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या 'ऑन द स्पॉट' हस्तक्षेपामुळे राहुरीकरांना आता मोठ्या दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.