गोकुळ दिघे यांचे अवैध गौण खनिज तस्करीवर कारवाईसाठी प्रांताधिकाऱ्याना निवेदन

संगमनेर Live
0
गोकुळ दिघे यांचे अवैध गौण खनिज तस्करीवर कारवाईसाठी प्रांताधिकाऱ्याना निवेदन


संगमनेर LIVE (आश्‍वी) | संगमनेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवैध गौण खनिज आणि वाळू तस्करीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी आणि तस्करी रोखण्यासाठी भाजपचे आश्‍वी मंडल अध्यक्ष गोकुळ दिघे यांनी नुकतेच प्रांताधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

​या निवेदनाद्वारे गोकुळ दिघे यांनी तालुक्यातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकताना म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी नदीपात्रातून आणि डोंगराळ भागातून अवैध उपसा होत असून यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. या तस्करीच्या व्यवसायात अनेक सराईत गुन्हेगारांचा वावर वाढल्याने सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण असून, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 

त्यामुळे हा विषय राज्याचे जलसंपदा तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रशासनाला अवैध गौण खनिज तस्करांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आणि सराईत गुन्हेगारांना चाप लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवून या गौण खनिज माफियांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान ​गोकुळ दिघे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि पालकमंत्र्यांच्या थेट हस्तक्षेपामुळे तालुक्यातील गौण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहेत. भाजपच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनानंतर आता महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन पालकमंत्र्यांच्या आदेशाची कशा प्रकारे अंमलबजावणी करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

​“तालुक्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट आम्ही कदापि सहन करणार नाही. पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार प्रशासनाने आता कोणत्याही दबावाला बळी न पडता थेट कारवाईच्या मैदानात उतरावे आणि या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालावा.” अशी मागणी भाजपचे गोकुळ दिघे यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !