मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला विद्यार्थ्याचा ‘विज्ञानाचा तास’
◻️ “घोकमपट्टी सोडा, विज्ञानाची कास धरा” पालकमंत्र्यांकडून विद्यार्थ्याना यशाचा कानमंत्र
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | डॉ. सी. व्ही. रामन् कोण होते, विक्रम साराभाई यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना कोणत्या उपाधीने ओळखले जातात, अंतराळातील मोहीमा कोणी यशस्वी केल्या असे प्रश्न विचारून जलसंपदा तथा पालक मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्याचा तास घेतला.
बेलापूर येथील एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्याना गौरविण्यात आले. कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी भाषणाला फाटा देत व्यासपीठावरून थेट विद्यार्थ्याशी प्रश्न उतराच्या रुपाने संवाद साधला.
आपल्या देशाला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा इतिहास आहे.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळेच अमुलाग्र बदल आपल्याला पाहायला मिळत आहे.मात्र हे ज्ञान विद्यार्थ्याना पुस्तकात मिळणार नाही. कारण शालेय अभ्याक्रमाची चौकट ठरलेली आहे. घोकमपट्टीच्या शिक्षणाचे दिवस आता संपले आहेत. देशात होत असलेल्या बदलाचे ज्ञान विद्यार्थ्याना देण्याची जबाबदारी संस्थाचालक आणि शिक्षकांवर असल्याची जाणीव त्यांनी करून दिली.
मंत्री विखे पाटील यांनी देशाने यशस्वी केलेल्या अंतराळ मोहीमेच्या संदर्भात विद्यार्थ्याना माहीती दिली. ऑपरेशन सिंदूर पासून ते अगदी अलिकडेच यशस्वी झालेल्या बाहुबली या यशस्वी मोहीमेबद्दल प्रश्न त्यांनी शिक्षकांनाही विचारले. घोकमपट्टीपेक्षा पुस्तकी ज्ञानापलिकडे जावून विद्यार्थ्याना जगाचे ज्ञान मिळावे म्हणूनच शैक्षणिक संस्थाची गुंतवणूक असली पाहीजे आशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून सोशल मिडीयावर फार वेळ घालवू नका. योग्य माहीतीसाठी त्याचा उपयोग करा. समाज माध्यम हे जीवनाचे अंतिम ध्येय नाही असा मौलिक सल्लाही मंत्री विखे पाटील यांनी दिला.
शाळांच्या भिंती आता देशाचा इतिहास आतापर्यत झालेल्या संशोधन कार्याने रंगल्या पाहीजेत. मूलभुत शिक्षणाच्या पलिकडे जावून विद्यार्थ्याच्या ज्ञानासाठी गुंतवणुक करण्याचा सल्ला त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
जिल्हा परिषदेच्या गणित - विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठी यापुर्वी फक्त पाच लाख रुपयांचा निधी देण्यात येत होता यामध्ये वाढ करून एक कोटी रुपये यापुढे देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.