रघुवीर खेडकरांच्या पद्मश्रीने लोककलावंतांची मान उंचावली - बाळासाहेब थोरात
◻️“संगमनेरची माती हेच माझे आई-बाप”; सत्काराला उत्तर देताना रघुवीर खेडकर भावुक
संगमनेर LIVE | तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे. या क्षेत्रात अनेक चढ-उतार सुरू असताना देखील रघुवीर खेडकर यांनी आपले जीवन या कलेसाठी समर्पित केले. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा राज्यभरातील तमाशासह सर्व लोककलावंतांचा सन्मान असल्याचे गौरवोद्गार कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
कवी अनंत फंदी खुलेनाट्यगृह येथे संगमनेर मधील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल लोक कलावंत रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, नूर मोहम्मद शेख प्रा. एस. झेड. देशमुख, डॉ. सोमनाथ मुटकुळे, डॉ. संजय दळवी, हिरालाल पगडाल, नामदेव गुंजाळ, यांच्यासह रघुवीर खेडकर यांचे कुटुंबीय व संगमनेर मधील विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेरला कवी अनंत फंदी, लोकशाहीर विठ्ठल उमप, पवळा हिवरगावकर, गुलाबबाई संगमनेरकर, कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांच्यासह लोककलावंतांची मोठी परंपरा लाभली आहे. तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे. अनेक अडचणींवर मात करून ही लोककला पुढे नेण्याचे काम रघुवीर खेडकर यांनी केले. १८५७ चा उठाव, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा लढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही या लोककलाकारांची मोठी योगदान राहिले आहे.
कोरोना काळामध्ये रघुवीर खेडकर यांनी कलावंत सांभाळले. आज या मनोरंजन क्षेत्रात मोठी स्पर्धा झाली असून स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन आव्हाने पेलण्यासाठी रघुवीर खेडकर कायमसज्ज असतात त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा संगमनेर करांसाठी अभिमानास्पद असून ते आता देशाचे कलावंत झाले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पद्मश्री रघुवीर खेडकर म्हणाले की, मला आजही वाटत नाही की हा पुरस्कार मला मिळाला आहे. महाराष्ट्रातील रसिकांचे प्रेम आणि संगमनेर करांच्या आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे संगमनेर ही माझी कर्मभूमी आहे आणि या संगमनेरचा मला कायम अभिमान आहे. खूप संघर्ष केला, झगडलो. संगमनेरच्या मातीने मला संस्कार दिले. संगमनेर माझी आई आणि बाप आहे. वयाच्या नव्या वर्षी रंगमंचावर आलो आणि तिथून सोंगाड्या झालो माझ्या बहिणीने साथ. ही संगमनेरची भूमी आहे आज हा सोहळा पाहताना आई हवी होती असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.
डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरच्या सर्वागीण विकासाचा पाया घेतला आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हा समर्थ वारसा पुढे चालवला. रघुवीर खेडकर यांनीही लोककला जीवनाचा ध्यास म्हणून जपली. फक्त पुरस्कार देऊन भागणार नाही तर सरकारने तमाशांना आर्थिक अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली. तमाशा आणि प्रबोधनाचे काम केले असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अगोदर कांताबाई सातारकर आणि आता रघुभाऊ यांच्या पद्मश्री पुरस्कारासाठी प्रयत्न केले आणि त्यातून संगमनेरला हा पद्मश्री मिळाल्याने आपल्या सर्वांचा मान उंचावला असे ते म्हणाले.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, रघुवीर खेडकर यांचा पुरस्कार संगमनेर शहर आणि तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. तमाशा ही लोककला महाराष्ट्राची ओळख असून या पुरस्काराने तमाशा लोककलेचा गौरव झाला आहे. या पुरस्कारामुळे नवीन कलावंतांना प्रेरणा मिळणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सत्यजीत तांबे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ संतोष खेडलेकर यांनी केले. डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आभार मानले.
पद्मश्री रघुवीर खेडकर यांना शिस्तबद्ध परेडने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पुष्पवृष्टी करून त्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. नटरंग उभा हे गीत सादर करून त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला यावेळी रघुवीर खेडकर यांनी व्यासपीठावरून खाली येत सर्व रसिक प्रेक्षकांना दंडवत घालून अभिवादन केले. यावेळी खेडकर कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले होते.