वडगावपान येथे १२ वर्षीय चिमुकलीवर अॅसिड हल्ल्यामुळे तालुका हादरला!
◻️ मंत्री विखे, आमदार खताळ, माजी मंत्री थोरात यांनी घेतली माहिती; उपचाराचा संपूर्ण खर्च ‘एसएमबीटी’ करणार
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी सायकलवरून चाललेल्या इयत्ता सहावीतील अवघ्या १२ वर्षीय चिमुकलीवर भरदिवसा एका अज्ञात नराधमाने अॅसिड फेकून हल्ला केला. या अमानुष हल्ल्यात विद्यार्थिनीचा चेहरा गंभीर भाजला असून तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, महिला आणि शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वडगाव पान परिसरात मंगळवारी (दि. १७) सकाळी ११.४० वाजेच्या सुमारास विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. त्यावेळी मोटर सायकलवरून आलेल्या एका अज्ञात तरुणाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून तिच्यावर अचानक अॅसिड फेकले. हल्ल्यानंतर मुलीने जीवाच्या आकांताने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती देत मुलीला उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात हलवले.
या पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झालेले असून आई अत्यंत गरीब आहे. शिक्षणासाठी ही मुलगी वडगाव पान येथे आपल्या मामाकडे राहत होती. अशा निरागस आणि निष्पाप मुलीवर झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर घटनेचे पडसाद थेट विधानसभेत उमटले आहेत. आमदार अमोल खताळ यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेत मुलीला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत प्रवरा रुग्णालयाला उपचाराबाबत तातडीच्या सूचना दिल्या. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने, आरोपीच्या शोधासाठी विशेष पोलीस पथक नेमण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना दिले आहेत.
घटनेची माहिती मिळताच कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत गुन्हेगाराला त्वरित बेड्या ठोकण्याची मागणी केली. “गुन्हेगाराला कोणतीही जात-धर्म नसतो, तो केवळ गुन्हेगार असतो”, असे ते म्हणाले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि युवक कॉग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी तातडीने प्रवरा रुग्णालय गाठले. त्यांनी जखमी मुलीची आस्थेवाईकपणे चौकशी करून तिच्या आई व मामांना धीर दिला. यावेळी डॉ. सुधीर तांबे यांनी, “या चिमुकलीच्या उपचाराचा व दवाखान्याचा संपूर्ण खर्च ‘एसएमबीटी’ (SMBT) सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात येईल,” असे सांगितले. तसेच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली.
यावेळी संतप्त प्रतिक्रिया देताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, “कालच पठार भागात एका मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर चाकू हल्ला झाला आणि आज एका १२ वर्षीय चिमुकलीवर अॅसिड हल्ला होतो. हा शिवरायांचा, सावित्रीबाईचा महाराष्ट्र आहे. इथे महिलांचा असा अपमान होत असेल, तर ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत निंदनीय बाब आहे. मुलींना आपण शिक्षणात पुढे आणत आहोत, पण अशा दहशतीमुळे त्या कशा पुढे जातील? प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून गुन्हेगाराला जरब बसेल अशी शिक्षा द्यावी.” अशी मागणी केली.
दरम्यान, संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलीसांकडून परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. समाजातील सर्वच स्तरांतून या घटनेचा निषेध होत असून, आरोपीला तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे.